Ram Charan and Upasana Konidela to Welcome Second Baby : साऊथ सुपरस्टार अभिनेता राम चरण दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी उपासना कामिनेनीने इन्स्टाग्रामवर एक सुंदर व्हिडीओ शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. लेकीच्या जन्माच्या दोन वर्षांनंतर आता ते दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

राम चरण व उपासना यांच्या लग्नाला १३ वर्षे झाली आहेत. दोघांनी २०१२ साली लग्न केलं होतं. त्यानंतर २०२३ मध्ये त्यांनी ते आई-बाबा होणार अशी गुड न्यूज दिली होती. उपासनाने २० जून २०२३ रोजी गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव क्लिन कारा कोनिडेला ठेवलं. आता राम व उपासना यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे.

“ही दिवाळी डबल सेलिब्रेशन, डबल प्रेम आणि डबल आशीर्वाद देणारी होती,” असं कॅप्शन लिहून उपासनाने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत उपासनाचे कुटुंबीय तिचं औक्षण करताना व अभिनंदन करताना दिसत आहेत. दाक्षिणात्य स्टार व राम चरणचे वडील चिरंजीवी व उपासनाचे वडील यांचीही झलक व्हिडीओत दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

उपासना कामिनेनीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तसेच राम चरण व उपासना यांचे दुसऱ्या बाळाच्या आगमनासाठी अभिनंदन करत आहेत.

राम चरण व उपासना कामिनेनी यांचा साखरपुडा डिसेंबर २०११ मध्ये झाला होता. त्यानंतर १४ जून २०१२ रोजी हैदराबादमध्ये त्यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं. लग्नानंतर ११ वर्षांनी या जोडप्याने आई-बाबा व्हायचं ठरवलं. २० जून २०२३ रोजी त्यांना मुलगी झाली. तिचं नाव क्लिन कारा कोनिडेला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांची मुलगी दोन वर्षांची झाली. आता त्यांच्या घरी दुसरा सदस्य येणार आहे.

राम चरण तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे. तो गेम चेंजर, आरआरआर, रंगस्थलम, मगाधीरा, येवडू या सिनेमांसाठी ओळखला जातो. तर, त्याची पत्नी उपासना कामिनेनी ही अपोलो हॉस्पिटल्सची उपाध्यक्ष आहे. उपासना सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. ती बी पॉझिटीव्ह या मॅगझिनची मुख्य संपादक आहे. तसेच उपासना कामिनेनी फॅमिली हेल्थ प्लॅन इन्शुरन्स टीपीए लिमिटेडची मॅनेजिंग डायरेक्टर आहे.