बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा साचेबद्ध भूमिका न करण्यासाठी ओळखला जातो. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने रणदीपने सर्वांची मने जिंकलेली आहेत. पण, अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी माजी पोलो प्लेअर असलेल्या रणदीपला घोड्यांचे फार वेड आहे. काही दिवसांपूर्वी उपासमारीने कचरा खाण्याची वेळ आलेल्या नऊ घोड्यांना रणदीपने दत्तक घेतल्याने त्यावेळी तो बराच चर्चेत आला होता.
रणदीपचे गुडगाव येथे स्वतःचे फार्म हाउस असून तेथे त्याने पोलो क्लबही स्थापन केले आहे. येथे उच्च जातीच्या शर्यतीतील ४० घोड्यांचे पालन-पोषण केले जाते. काही दिवसांपूर्वी रणदीपला माथेरान येथे घोड्यांना अमानुष वागणूक देत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर आला. त्यावेळी घोड्यांचा होत असलेला छळ पाहून रणदीपला धक्का बसला. त्यानंतर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्याऐवजी तो थेट माथेरानमध्ये पोहचला. याविषयी बोलताना रणदीप म्हणाला की, माथेरानमधील घोड्यांना कशी वागणूक दिली जातेय याचा व्हिडिओ मला अधुना अख्तरने पाठवला होता. त्यानंतर माझा मित्र आदिल गांधी आणि त्यांचा मुलगा रियाद यांच्यासोबत मी जखमी घोड्यांसाठी काही औषध घेऊन तेथे गेलो. हे घोडे तेथील हॉटेल आणि दुकांनासाठी सामानाची ने-आण करतात. मात्र, माथेरानमधील टॉय ट्रेन बंद पडल्यापासून या घोड्यांवरील भार अधिकचं वाढला आहे. काही लहान घोड्यांवर तर एकाच वेळी तीन-तीन गॅस सिलिंडरचे ओझे वाहिले जाते. हा एकप्रकारे त्यांच्यावर अत्याचार आहे. मला माहित आहे की येथील लोकांचा रोजगार हा घोड्यांवर अवलंबून आहे. ते काही जाणूनबुजून घोड्यांना त्रास देत नाही. पण त्यांच्यावर अतिजास्त भारही लादू नका की जेणेकरून त्यांना दुखापत होईल, असे रणदीप म्हणाला.
पुढे रणदीप म्हणाला की, या लोकांना आपण घोड्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत जागृत करण्याची गरज आहे. नाहीतर हे घोडे जास्त दिवस जगू शकणार नाही. रहदारीच्या नियमांप्रमाणे घोड्यांच्या पालन-पोषणासाठीही काही नियम करण्याची गरज आहे. अशा काही दुखापत झालेल्या घोड्यांना मी दत्तक घेतले आहे. पण मी असं किती दिवस करू शकेन? त्यापेक्षा घोड्याच्या मालकांनीच त्यांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.