Rani Mukerji Recalls Mother Asked Producer to Drop her from Debut Movie : राणी मुखर्जीने तिच्या कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले आहे. पण, आता राणीने तिचा पहिला चित्रपट ‘राजा की बारात’च्या स्क्रीन टेस्टबद्दल तिची आई कृष्णा मुखर्जीची प्रतिक्रिया काय होती हे सांगितले आहे. तिच्या आईने चित्रपटाच्या निर्मात्याला तिला कास्ट करू नये असे सांगितले होते.
एएनआयशी बोलताना राणी म्हणाली, “माझ्या आईने मला ते करायला सांगितले आणि म्हणाली, नंतर ते कसे होते ते पाहू. माझ्या पहिल्या स्क्रीन टेस्टमध्ये तिला मी आवडले नाही. तिने निर्मात्याला सांगितले, ‘जर तू माझ्या मुलीला कास्ट केलेस तर तुझा चित्रपट बरबाद होईल, तुझे मोठे नुकसान होईल. तिला कास्ट न करणे चांगले.’ पण, निर्मात्याला मला कास्ट करायचे होते, म्हणून सलीम अंकल (चित्रपटाचे निर्माते) यांनी मला फायनल केले.”
राणी मुखर्जीच्या वडिलांची प्रतिक्रिया कशी होती?
राणीने तिच्या वडिलांच्या प्रतिक्रियेबद्दलही सांगितले. ती म्हणाली, “ते फारसे आनंदी नव्हते, कारण त्या काळात चित्रपट कुटुंबातील मुलं-मुली, विशेषतः मुली, क्वचितच अभिनयाकडे वळत असत. कुटुंबातील मुलं ते जास्त फॉलो करायचे. त्यावेळी ते थोडे वेगळे होते. मला वाटत नाही की त्यावेळी चित्रपटसृष्टी हा करिअरचा चांगला पर्याय मानला जात असे.”
राणी मुखर्जी सध्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे चर्चेत आहे. तिला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी आणि यशराज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्रा यांनी २०१४ मध्ये लग्न केलं. अत्यंत खाजगी समारंभात दोघांनी लग्न केलं होतं
राणीने ‘राजा की आएगी बारात’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अशोक गायकवाड यांनी केले होते. राणीने शादाब खान, मोहसिन बहल आणि गुलशन ग्रोव्हर यांच्याबरोबर काम केले होते. या चित्रपटात राणीने मालाची भूमिका केली होती, जी एका श्रीमंत माणसाशी लग्न करते.