झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या मालिकेचा शेवट नेमका कसा होणार, याची सध्या प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. त्यामुळे मालिकेच्या समाप्तीची घोषणा झाल्यानंतर लगेचच प्रेक्षकांमध्ये नेने वकील आणि अजयचा खरा खुनी कोण असेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्यामुळे मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईपर्यंत हे रहस्य गुपित ठेवून प्रेक्षकांची उत्कंठा ताणण्याचा निर्माता आणि दिग्दर्शकांचा प्रयत्न होता. मात्र, सध्या व्हॉटसअॅपवर या मालिकेच्या चित्रीकरणावेळीची काही छायाचित्रे फिरत आहेत. या छायाचित्रांमध्ये पोलीस सुषमा उर्फ सुशल्या आणि माधवाची बायको निलीमा यांच्या हातात बेड्या घालून नेताना दिसत आहे. त्यामुळे या दोघींनीच नेने वकील आणि अजयचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. सुशल्या हीच खुनी असल्याचा प्रेक्षकांना काहीप्रमाणात अंदाज असला तरी यामध्ये असलेला निलीमाचा सहभाग प्रेक्षकांसाठी धक्कादायक आहे. निलीमाने कोणत्या कारणामुळे सुषमाला साथ देऊन नेने वकील आणि अजयचा खून केला, असेल, हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडण्याची शक्यता आहे. अर्थात या मालिकेच्या कथानकातील आतापर्यंतची धक्कादायक वळणे पाहता सुशल्या आणि निलीमाच वाड्यातील घटनांना जबाबदार असतील, याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी ‘रात्रीस खेळ चाले’चा शेवटच्या भागाची वाट पाहावी लागेल.
‘रात्रीस खेळ चाले’मधील नाईकांचा वाडा आणि आयेपासून सुशल्या, दत्ता, नेने वकील, अभिराम आणि अगदी महिन्याभरापूर्वी आलेला विश्वासराव अशा अनेक मंडळींनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मात्र, ही नाईक मंडळी प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती. त्याजागी आदिनाथ कोठारे आणि तेजस्विनी पंडित या जोडीची ‘हंड्रेड डेज’ ही रहस्यमय मालिका दाखल होणार आहे.
कोकणाच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली, एकामागोमाग एक घडत जाणाऱ्या रहस्यमय घटनांचा माग घेताना कोकणातील सगळ्या प्रथा, अंधश्रद्धा यांचा आधार घेत रचलेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला सुरुवातीला विरोध झाला होता. मात्र आता दोनशे भागांच्या टप्प्यावर असताना या मालिकेने अनेक विक्रम नोंदवले आहेत. कुठलेही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा आज घराघरांत लोकप्रिय ठरल्या आहेत.
nilijma