Dial 100 Review : मनोज वाजपेयीच्या तिहेरी भूमिकेत नटलेला ‘डायल १००’ आहे तरी कसा?

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीचा बहुप्रतिक्षित ‘डायल १००’ झी ५ वर रिलीज झालाय. या चित्रपटात मनोरंजनाची कनेक्टिव्हिटी किती मजबूत आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

dial 100 manoj wajpeyee

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ‘डायल १००’ झी ५ वर रिलीज झालाय आणि त्याचे फॅन्स क्रेझी झालेत. १ तास ४४ मिनिटांच्या या ‘डायल 100’ चित्रपटात मनोरंजनाची कनेक्टिव्हिटी किती मजबूत आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चित्रपटाची कहाणी सुरू होते मुंबईतल्या पाऊसाने. सर्व बॉलिवूड दिग्दर्शकांना माहीत असलेल्या गुन्ह्यासाठी परिपूर्ण वातावरण निर्मीती म्हणजे धो धो पडणारा पाऊस. अशाच मुंबई पोलिस आपत्कालीन कॉल सेंटरपासून कथेचा सस्पेन्स सुरू होतो. पोलीस अधिकारी निखिल सूद रात्रीची ड्युटी करत असतो. पोलीस यंत्रणेच्या हेडफोनवरून सार्वजनिक कॉलला उत्तर देणं हे त्याचं काम असतं. वैयक्तिक फोनद्वारे घरी पत्नी आणि मुलामधील मतभेद सोडवत असतो. इतक्यात ऑफिसमध्ये एक फोन येतो. कॉल करणारा व्यक्ती हा इतर कोणाऐवजी फक्त निखिलशी बोलण्याचा आग्रह धरतो. निखिल फोन घेतो. समोर फोन करणारा निखिलला विचित्र प्रश्न विचारू लागतो. सुरुवातीला निखिलला असं वाटतं की कोणीतरी दारूच्या नशेत फोन करून त्रास देत आहे. पण हळूहळू फोन करणाऱ्याचे शब्द विचित्र होऊ लागतात. कथेच्या पुढे जाऊन, हा कॉल निखिल आणि त्याच्या कुटुंबासाठी एक वाईट काळ बनून घोंगावतो.

कथा:

निखिल सूद एका ठिकाणी हा डायलॉग बोलताना दिसून येतो. मात्र तो कुठून बोलतोय हे दिसत नाही. स्पॉइलर होऊ शकतं. पण हा संवादच या चित्रपटाच्या पुढच्या निष्कार्षाकडे इशारा करतो. कारण चित्रपटाचे कथानक अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्या 2019 च्या ‘बदला’ या चित्रपटासारखे आहे. पण, मनोरंजनाच्या बाबतीत हा चित्रपट ‘बदला’च्या पुढे फार दूरपर्यंत जात नाही.

निखिल सूद या चित्रपटाचा मुख्य पात्र असून तो मुंबई पोलीस आपत्कालीन कॉल सेंटरचा अधिकारी असतो. पोलिसांचा हा विभाग आजपर्यंत चित्रपटांमध्ये नीट दाखवला गेला नाही. ट्रेलर आणि चित्रपटाच्या शीर्षकावरून हे अपेक्षित होते की चित्रपटाची कथा, पोलिस कॉल सेंटरच्या अडचणी आणि गुंतागुंत या विभागाला हाताळण्यात येईल. पण चित्रपटात असं काही दिसलं नाही. याचा अर्थ असा की जर निखिल सूद या विभागाऐवजी इतर कोणत्याही विभागात असते तर कथेमध्ये फारसा फरक पडला नसता.

‘डायल 100’ ही सस्पेन्स थ्रिलर फिल्म आहे. पण चित्रपटात काय सस्पेन्स होता, तो अजूनही आमच्यासाठी सस्पेन्स आहे. चित्रपटाच्या पहिल्या 20 मिनिटांमध्ये सर्व सस्पेन्स उघड होतो आणि उरलेला दीड तास पूर्णपणे वाया जातो. संपूर्ण चित्रपटात एकही क्षण असा नाही जो थरारक होऊ शकेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

अभिनय :

मनोज बाजपेयी पोलिसांची भूमिका करू शकतो तशी इतर कोणीही करू शकत नाही, हे फॅन्सना आता कळलंय. डायल 100 मध्ये तो पती आणि वडिलांची चमकदार भूमिका करतोच आहे. पण त्यातली पोलिसाची भूमिका म्हणजे सोन्याहूनही पिवळं. ट्रेलरमध्ये नीना गुप्ता न्याय आणि सूड घेण्याविषयी बोलताना दिसतात. म्हणून हा चित्रपट मनोज बाजपेयीच्या शोकेसपेक्षा खूप जास्त आहे चित्रपट पाहिल्यावर समजतं. जर आपला मुलगा प्रत्येकाशी खोटं बोलत असेल तर वडिलांनी काय करावे? तुम्ही त्या मुलाला कसं वळणावर आणतो? विशेष म्हणजे जेव्हा तो मुलगा प्रौढ असतो आणि त्याचे सर्व मित्र पार्टी करत असतात? एखाद्या तरुणाला कानाखाली लगावल्याने काही फायदा होतो का? मुलाला धरून ठेवण्यासाठी पालकांना नेहमी चांगले पोलिस, वाईट पोलिस बनावं लागतं का ? आणि तसं बनून आपण मुलांना चांगले संस्कार देण्यात यशस्वी होऊ का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अभिनेता मनोज वाजपेयी यांनी पोलिस, पिता आणि पती या तिहेरी भूमिकेतून उत्तमरित्या दिले आहेत.

मनोज बाजपेयीच्या पात्राप्रमाणे नीना गुप्ताला अशा ग्रे शेड्स कॅरेक्टरमध्ये पाहणं रिफ्रेशिंग होतं. पण त्यांच्या पात्राला काही जुन्या गोष्टी वगळता चित्रपटात फारसं काही करायचं नव्हते. नीना जींना अशा पात्रात पाहणं मनोरंजक आहे. निखिल सूदच्या पत्नी प्रेरणा सूदची भूमिका साक्षी तंवर हिने साकारली आहे. एका मध्यमवर्गीय गृहिणीची भूमिका तिने जिवंत केलीय. साक्षीच्या पात्रामध्ये फारसा घटक नव्हता. पण तरीही ती जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा ती आपला ठसा उमटवतेच.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

 

लेखन-दिग्दर्शन

‘डायल 100’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रेन्सिल डिसिल्वा यांनी केलं आहे. ‘रंग दे बसंती’ आणि ‘अक्स’ सारख्या सुपरहीट चित्रपटांचं लेखन करणारे रेन्सिल ‘डायल 100’मध्ये मात्र अपयशी ठरले आहेत. चित्रपटाचे प्रत्येक दृश्य एखाद्या चित्रपट, मालिका, मालिकेत हजार वेळा पाहिल्यासारखे वाटते. दिग्दर्शनातही काही विशेष सर्जनशीलता नाही. वर्षानुवर्षे दाखवलेल्या त्याच पद्धती या चित्रपटात वापरल्या गेल्या आहेत.

‘डायल 100’ हा जुन्या बाटलीत नवी दारू असा चित्रपट आहे. ज्यात चांगली स्टारकास्ट सुद्धा ताजेपणा आणू शकली नाही. चित्रपट मनोरंजन करण्यात अपयशी ठरतो. आमच्या मते, ‘डायल 100’ चा हा कॉल नाकारण्यात काहीच नुकसान नाही. शेवटी तुमचा निर्णय आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Review dial 100 manoj bajpayee excels in his triple role film prp