ऋषी कपूर यांनी त्यांच्या वडिलांच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. पहिला राष्ट्रीय पुरस्कारही त्यांनी जिंकला होता. ऋषी कपूर यांनी एकामागून एक चित्रपटांमध्ये काम केले. ऋषी कपूर यांचे बॉलीवूडमध्ये एक उत्तम करिअर होते. त्यांनी स्वतःच्या बळावर अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
अलीकडेच दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी सांगितले की, ऋषी कपूर यांनी त्यांचा ‘हम तुम’ चित्रपट नाकारला होता, कारण त्यांना वाटले की ही भूमिका खूपच लहान आहे. नंतर ऋषी कपूर यांनी चित्रपटात काम करण्यास होकार दिला. या चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कुणाल कोहली म्हणाले, “जेव्हा आम्ही त्यांना (ऋषी कपूर) भेटायला गेलो होतो, तेव्हा ते पूर्ण कॅरेक्टर रोलची भूमिका करत नव्हते. ते फक्त मुख्य भूमिका साकारत होते. ते म्हणाले की, या चित्रपटात मला करण्यासारखे काहीच नाही. माझ्याकडे फक्त सात सीन आहेत, मी नाही करणार, दुसऱ्याकडून करून घ्या; असं बोलून त्यांनी आम्हाला परत पाठवले. कुणाल यांनी आशा सोडली नाही आणि निर्माता आदित्य चोप्राला सांगितले की ते पुन्हा प्रयत्न करतील.
ऋषी कपूर कसे तयार झाले?
कुणाल कोहली पुढे म्हणाले, “मी त्यांच्याशी पुन्हा बोललो आणि चित्रपटातील त्यांच्या सर्व सीन्सवर चर्चा केली. त्यांना प्रत्येक सीन आवडले. ते म्हणाले की हे सर्व सीन्स चांगले आहेत, त्यात आणखी भर घाला. मी म्हणालो सर, तुम्हाला फक्त चित्रपटात फिरायचे आहे की एक मजबूत प्रभाव सोडायचा आहे? मग ते म्हणाले, हो, ठीक आहे, ही चांगली कल्पना आहे, चला ते करूया. कुणाल पुढे म्हणाले की, त्यानंतर त्यांची ऋषी कपूर यांच्याशी चांगली मैत्री झाली. ‘हम तुम’ चित्रपटात ऋषी कपूर यांनी सैफ अली खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
‘हम तुम’ चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित झाला
‘हम तुम’ या वीकेंडला थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला आहे. खरंतर हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. सैफ अली आणि राणी मुखर्जी स्टारर ‘हम तुम’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. इतकी वर्षे उलटूनही आजही तरुणांमध्ये या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते.