बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहिण सबा अली खान ही कायम लाइमलाइटपासून दूर जरी राहत असली तरीही ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच आपल्या कुटूंबाचे आणि पैतृक घर पटौदी पॅलेसचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये एका फोटोफ्रेममध्ये सबा अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर या दोघी दिसून येत आहेत. या फोटो फ्रेमनंतर एका कार्डवर लिहिलेला एक मेसेज या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलाय. या कार्डवर अभिनेत्री करीना कपूरने लिहिलेला हा मेसेज आहे. यात करीनाने लिहिलंय, “प्रिय सबा, तुला हे पाहून खूप आनंद होईल…माझ्याकडून तुला खूप सारं प्रेम आणि नशीब कायम तुझ्यासोबत असू देत या शुभेच्छा…” या कार्डमध्ये शेवटी खाली करीनाचं नाव दिसून येत आहे. हे कार्ड शेअर करत सबाने लिहिलं, ‘किती गोड आठवणी आहेत या, नाही का?’, असं म्हणत तीने ही थ्रोबॅक पोस्ट शेअर केली आहे.

 

२०१२ मध्ये करीनाने सैफ अली खान सोबत विवाह केला होता. पण लग्नाआधी करीनाने तिची नणंद सबा अली खानला हा मेसेज पाठवला होता. ९ वर्षानंतर आता सबाने हा मेसेज रिवील केलाय. सबाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतेय.