scorecardresearch

Premium

हिंदी वेबसीरिजचा ‘सॅक्रेड’ डाव

सुरुवातीलाच कथेतले बरेचसे पत्ते मांडायचे आणि मग त्यांची एकमेकांशी सांगड घालत

हिंदी वेबसीरिजचा ‘सॅक्रेड’ डाव

|| सुहास जोशी

सुरुवातीलाच कथेतले बरेचसे पत्ते मांडायचे आणि मग त्यांची एकमेकांशी सांगड घालत, त्यातील हरवलेले दुवे मांडत, कधी नवीनच दुवे निर्माण करत शेवटाला सगळ्याचा उलगडा करायचा ही पद्धत पडद्यावर पाहायला नक्कीच रंजक असते. या पद्धतीमुळे पहिल्याच दणक्यात तुम्हाला आपण काहीतरी वेगळं पाहतोय याची जाणीव होते आणि प्रचंड उत्सुकता निर्माण होते. पण तीच उत्सुकता टिकवून ठेवायची असेल तर प्रत्येक भागात तेवढीच मेहनत लागते, अन्यथा मग गतिरोधकाची जाणीव होत राहते. बहुचर्चित अशा ‘सॅक्रेड गेम’ या नेटफ्लिक्सवरील वेबसीरिजमध्ये त्रुटी सांगायची तर एवढीच सांगता येईल. तेवढे सोडल्यास मालिकेतील पात्रांच्या घरातील बारीकसारीक वास्तव टिपतानाच मोठा पट उलगडून दाखवण्यात सीरिज चांगलीच यशस्वी झाली आहे. ६ जुलैला प्रदर्शित झालेली नेटफ्लिक्सवरील ही पहिलीच हिंदी वेबसीरिज आहे.

अनुराग कश्यपचे दिग्दर्शन, नवाजुद्दीन सिद्दिकी, सैफ अली खान आणि राधिका आपटे या कलाकारांचा समावेश यामुळे या वेबसीरिजबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अनुराग कश्यप टच तर आहेच, पण नवाजुद्दीनने मालिका थेट खिशात टाकली आहे. मुंबईतील गँगस्टर हा विषय रूपेरी पडद्यासाठी आपल्याकडे नवीन नाही. पण हिंदी वेबसीरिजमध्ये तो पहिल्यांदाच आला आहे. विक्रम चंद्रा यांच्या ‘सॅक्रेड गेम’ या २००६ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीवर ही वेबसीरिज आधारित आहे. अर्थात मूळ कादंबरी आणि सीरिज अशी तुलना होत राहील, पण त्याकडे लक्ष न देता जे स्क्रीनवर दिसतंय त्या विषयी बोलणेच अधिक श्रेयस्कर राहील. ‘सॅक्रेड गेम’ अर्थातच धार्मिक चाल किंवा कपट अशा अर्थाने जाणारे हे कथानक असल्यामुळे काही गोष्टी अतिरंजित होतात, पण एकूण सीरिजच्या प्रवाहात ते खपून जाते. सीरिजची सुरुवात ही खेचून घेणारी आहे. मुंबई पोलीस दलातील प्रामाणिक अधिकारी सरताज सिंग (सैफ अली खान) हा तत्त्वाने वागणारा असतो. खोटय़ा एनकाऊं टरबाबत चौकशी समितीपुढे खोटं बोलणार नाही म्हणून तो वरिष्ठांकडे अडून बसलेला असतो. दुसरीकडे दहा वर्षांतील त्याच्या नोकरीत एक पाकीटमार पकडण्याव्यतिरिक्त त्याला कसलेही यश लाभलेले नसते. आणि त्याला एके दिवशी मुंबईतला पूर्वाश्रमीचा डॉन आणि सध्या भारताबाहेर असणाऱ्या गणेश गायतोंडे (नवाजउद्दीन सिद्दिकी) याचा फोन येतो. गायतोंडे भारतात आलेला असतो आणि त्याला सरताजबरोबर बोलायचे असते. मोबाइलवरच संभाषण सुरू होते. दुसरीकडे सरताज आणि त्याचा साथीदार (जितेंद्र जोशी) गायतोंडेला शोधायला बाहेर पडतो. अखेरीस गायतोंडेचा ठावठिकाणा लागतो. गोडाऊ न सदृश अशा त्या वास्तूला तोडल्याशिवाय प्रवेश करणे कठीण असते. त्या वास्तूच्या बाहेरच सरताजला बसवून गायतोंडे त्याची आत्मकथा सांगू लागतो. सकाळी ती वास्तू तोडली जाते आणि सरताज आत प्रवेश करतो. गायतोंडे शेवटची चार-पाच वाक्य बोलतो आणि स्वत:ला गोळी मारून घेतो. त्या शेवटच्या वाक्यात एक वाक्य महत्त्वाचे असते. येत्या पंचवीस दिवसांत सर्व संपून जाणार आहे. सर्वजण मरणार. कोणीच जिवंत राहणार नाही.

आणि मग सुरू होतो तो या पंचवीस दिवसांचा प्रवास आणि त्याच पाश्र्वभूमीवर गणेश गायतोंडेचे पूर्वायुष्य उलगडत जाते. राज्याचा गृहमंत्री (गिरिश कुलकर्णी), पोलीस दलातील अधिकारी, विदेश मंत्रालयातील अधिकारी, चित्रपट-मालिकांमधील नायिका असा हा सारा प्रवास सुरू राहतो. इंटेलिजन्स ब्युरो, रॉचे अधिकारीदेखील तपास करू लागतात. अनेक गुंते उलगडत असतात, त्यामागील धार्मिक कारण डोकावत राहते पण या सगळ्याचे पूर्ण सूत्र शेवटीच उलगडते कारण ते संगतवार सांगणारा गायतोंडे मेलेला असतो.

उत्तरोत्तर रंजक होईल असेच हे कथानक असल्यामुळे प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्यासाठी विशेष कथानक रचायची तशी गरज येथे नाही. पण एकाच वेळी १९७७ पासून आत्तापर्यंतचा गायतोंडेचा प्रवास आणि त्याच्या मृत्यूनंतरचे २५ दिवस असे दोन कालावधी एकाच वेळी दाखवणे एक कसब आहे. पटकथा आणि संकलनाच्या किमयेतून ते खूपच उत्तम प्रकारे साधले आहे. विशेषत: शेवटच्या भागात तर कमालच होते. एकूणच दिग्दर्शनावर अनुराग कश्यपची छाप असली तरी त्याच्या जोडीने विक्रमादित्य मोटवाने यांनीदेखील काही भाग दिग्दर्शित केल्यामुळे संगतीत थोडी गडबड होतेच. सेन्सॉर नामक प्रकरणाचा जाच नसल्यामुळे संवादात शिव्यांचा खच्चून वापर आणि सेक्स दृश्यांचा मुक्त वापर दिसतो. पण त्यामुळेच संवाद वास्तववादी होतात. सेन्सॉर असते तर दर पाचदहा मिनिटांनी म्यूट करावे लागले असते.

ही एक व्यवस्थित बजेट असलेली अशी मालिका आहे. त्यामुळे चांगले कलाकार यामध्ये घेणे शक्य झाले आहे आणि त्याचबरोबर चित्रीकरणावर कोठेही काटकसरीचा परिणाम जाणवत नाही. जवळपास संपूर्ण मालिका ही प्रत्यक्ष घटनास्थळावरच चित्रित झालेली आहे. स्टुडिओचा वापर अगदीच जेव्हा एखाद्या खोलीतला प्रसंग असेल तेव्हाच जाणवतो. कथानकाला गरजेच्या असणाऱ्या मुंबईतल्या सर्वच्या सर्व प्रत्यक्ष स्थळांचा थेट वापर झाला आहे. या सगळ्यामुळेच एकूणच हल्ली हिंदीत ज्या काही टपराट वेबसीरिज तयार होतात त्यांच्यावर थेट मात केली गेली आहे.

नवाजुद्दीन सिद्दिकीने संपूर्ण मालिकाच खिशात टाकली आहे. सैफ अली खान हा एरवी बॉलीवूडी हिरो असला तरी यामधील त्याची नायकाची भूमिका खूपच संयत पद्धतीने साकारली आहे. त्यासाठी त्याला बरीच मेहनत (अगदी वजन वाढवण्यापासून) घ्यावी लागली असावी हेदेखील जाणवते. तुलनेने राधिका आपटेकडून काहीशी निराशाच पदरी पडते. रॉ एजंटच्या पात्रात रंग भरण्याचा तिचा प्रयत्न जाणवतो, पण त्याचा पुरेसा प्रभाव पडत नाही. गिरिश कुलकर्णी आणि जितेंद्र जोशी हे दोन्ही मराठी कलाकार त्यांच्या पात्रांना पुरेपूर न्याय देतात. मालिकेच्या मधल्या टप्प्यावर (चौथा-पाचवा भाग) या खेळातील रंगत थोडी कमी होत जाते. अर्धवट रंगलेला खेळ असं वर्णन करावे लागते. पण गायतोंडे म्हणत असतो की, मै बिच्छू जैसा हू, पकडूंगा तो छोडूंगा नही, हे त्याच्या कथानकापुरते नक्कीच खरे ठरणारे आहे. नेटफ्लिक्सने पहिलीच हिंदी वेबसीरिज करताना निवडलेले कथानक, त्याची मांडणी, अभिनय अशा सर्व बाबींचा विचार केल्यास भविष्यातील हिंदी वेबसीरिजच्या निर्मितीवर बराच चांगला परिणाम होऊ  शकतो हे मात्र निश्चित.

  • सेक्रेड गेम – सीझन पहिला
  • ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sacred games web television series

First published on: 08-07-2018 at 03:34 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×