Saie Tamhankar on Banning Pakistani Artists : २२ एप्रिल रोजी काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर या दहशतवादी हल्ल्याविरुद्ध देशभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अनेक बॉलीवूड आणि मराठी कलाकारांनी सोशल मीडियामार्फत पोस्ट करत त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसंच या हल्ल्यानंतर सरकारनेही काही महत्त्वाचे निर्णय घेतले. या हल्ल्यानंतर भारताकडून काही पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन करण्यात आले.
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यालादेखील विरोध केला गेला. पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीबाबत अनेकांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. अशातच मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनेदेखील या प्रकरणी तिचं मत व्यक्त केलं आहे. बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत सई ताम्हणकर या प्रकरणाबद्दल बोलताना “कलेशी संबंधित सर्व गोष्टी स्वतंत्र ठेवल्या पाहिजेत” असं म्हणाली.
यावेळी सईने असं म्हटलं, “मला वाटतं या सगळ्यापासून कला ही वेगळी ठेवली पाहिजे. कला ही एक वेगळी भाषा आहे. त्यात कोणतेही अडथळे असतात, ना सेन्सॉर असतं. पण आयुष्य हे काही साधं सोपं नाही. ते खूप गुंतागुंतीचं आहे आणि हा आपल्या आयुष्याचाच भाग आहे. तरी मी खूप आशावादी व्यक्ती आहे. हे सगळं शांत झालं की, त्याबरोबरच्या इतर सर्व गोष्टीही आपोआप शांत होतील. मला असं वाटतं की, कला आणि कलेशी संबंधित सर्व गोष्टी स्वतंत्र ठेवल्या पाहिजेत.”
पुढे सईने देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल पाकिस्तानचं नाव घेत थेट भाष्य केलं. याबद्दल ती म्हणाली, “जेव्हा अशा गोष्टी घडतात; तेव्हा अनेक नागरिकांना त्यांची चूक नसूनही याचे परिणाम भोगावे लागतात. ज्यांचा यामध्ये सहभाग नसतो; त्यांना हे सगळं सहन करावं लागतं आणि हे दुर्दैवी आहे. मला मनापासून असं वाटतं की, युद्ध हे कशाचं उत्तर नक्कीच नाही. मात्र काही लोकांना सरळ भाषा कळत नाही आणि काही लोक म्हणजे पाकिस्तान. त्यांना साधी भाषा कळत नाही.”
यापुढे सईने असं म्हटलं, “अशा परिस्थितीत काही ठोस पावलं उचलावी लागतात आणि मला यासाठी आपल्या भारतीय सैन्याचा, सरकारचा अभिमान वाटतो. ते खूप चांगलं काम करत आहेत. या सगळ्यात ज्यांना याचे परिणाम भोगावे लागले त्यांच्याबरोबर आपल्या सर्वांच्या प्रार्थना आहेत. तसंच या परिस्थितीवर आपण लवकर काहीतरी उपाय शोधू अशी मला आशा आहे. पण हे एकदाचं संपलं पाहिजे.”