बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या सामाजिक कार्यातील सहभागासाठी चांगलाच ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये दबंगगिरी करणारा सलमान खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांसाठी मदतीचा हात पुढे करत असतो. सलमान खान अनेकांच्या मदतीला धावून जातो. याची अनेक उदाहरण मीडियातून पाहायला मिळतात.

नुकताच सलमान खानने  एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यात तो बच्चेकंपनीसोबत डान्स करताना दिसतोय. सलमानने काही दिव्यांग मुलांसोबत धमाल केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय. बॉलिवूडच्या भाईजानसोबत नाचताना या मुलांच्या चेहऱ्यावरदेखील आंनद झळकतोय.

सलमानने बिना काक यांच्या उमंग या संस्थेला भेट दिली होती तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.  या व्हिडीओत सलमान सोबतच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा डान्स करताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करत सलमानने कॅप्शन दिलं आहे. ” उमंगच्या मुलांसोबतच डान्स. ईश्वराचे आशिर्वाद सदैव तुम्हाला लाभो. लव्ह यू ऑल.” असं कॅप्शन त्यानं दिलंय.

21 मार्चला ‘डाउन सिंड्रोम डे’ पार पडला या निमित्ताने सलमानने एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. 2019 सालात ‘दबंग’ सिनेमाच्या शूटिंगवेळी सलमानने सोनाक्षीसोबत या खास मुलांची भेट घेतली होती. सलमानच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळतेय. सलमान खानला लहान मुलं आवडतात हे अनेकदा दिसून आलंय.  बऱ्याचदा तो बहिण अर्पिताच्या मुलांसोबत तसचं कुटुंबातील इतर मुलांसोबत मजा करताना दिसून आलाय. सलमान खान भाचा आहिलसोबत खेळतानाचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतो.

ईदच्या निमित्ताने 13 मे या दिवशी सलमानचा ‘राधे’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचसोबत सलमान खान ‘पठाण’ या सिनेमात शाहरुखसोबत झळकणार आहे. या सिनेमात तो गेस्ट रोलमध्ये दिसेल. सलमानने ‘पठाण’ च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. तर लवकरच तो कतरीना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत ‘टायगर-3’ या त्याच्या आगामी सिनेमाची शूटिंग सुरु करणार आहे.