Salman Khan Bodyguard Shera Acting Debut : बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा सर्वात विश्वासू बॉडीगार्ड शेराने आता अभिनयाच्या जगात प्रवेश केला आहे. तो १९९५ सालापासून सलमानबरोबर आहे. तो नेहमीच पडद्यामागे सलमानसाठी सावलीसारखा उभा राहिला, पण तो कधीच पडद्यावर दिसला नाही.
खरंतर, शेराने किराणा डिलिव्हरी अॅपच्या रक्षाबंधन मोहिमेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याच्या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि लोकांना त्याची दमदार शैली खूप आवडत आहे.
इन्स्टा मार्टच्या नवीन रक्षाबंधन जाहिरातीत, सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा अडचणीत असलेल्या किंवा गरजू अनेक महिलांसाठी ‘भावाची’ भूमिका साकारताना दिसत आहे. तो पावसात एका महिलेला ऑटोरिक्षा थांबवण्यास मदत करतो, छेडछाड करणाऱ्या वर्गमित्रापासून एकाला वाचवतो.
व्हिडीओच्या सुरुवातीला, शेरा घाईघाईने इन्स्टा मार्टच्या स्कुटीवर बसलेला दिसतो आणि म्हणतो, “भाऊ, मी फक्त १० मिनिटांत येतो.” यानंतर तो पावसात ऑटोची वाट पाहणाऱ्या एका महिलेला मदत करताना दिसतो आणि म्हणतो, “मी, शेरा, भाईचा बॉडीगार्ड आहे, मी रक्षण करतो, म्हणूनच प्रत्येक रक्षाबंधनाला, ज्यांचे भाऊ नाहीत त्यांनी मला त्यांचा भाऊ बनवले. मी माझे कर्तव्य केले, तुम्ही आधीच भाऊ आणि बहीण आहात, तुमचे कर्तव्य करा, फक्त १० मिनिटांत इन्स्टा मार्टकडून राखी आणि भेटवस्तू मागवा.”
ही जाहिरात शुक्रवारी, रक्षाबंधनाच्या अगदी आधी प्रसिद्ध झाली आणि शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवार सकाळपर्यंत इन्स्टाग्रामवरील मार्केटिंग पेज आणि फॅन क्लबने ती मोठ्या प्रमाणात शेअर केली. अनेकांनी शेराची तुलना युवराज सिंग आणि मिका सिंगशी केली.
शेराबद्दल सर्व काही
सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा, ज्याचे खरे नाव गुरमित सिंग जॉली आहे, तो १९९५ पासून सलमान खानचा प्रायव्हेट बॉडीगार्ड आणि सिक्युरिटी हेड आहे. तो टायगर सिक्युरिटी नावाची एक सुरक्षा फर्मदेखील चालवतो, जी गेल्या काही वर्षांत अनेक सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवत आली आहे. २०१७ मध्ये जस्टिन बीबरच्या मुंबई कॉन्सर्टमध्ये शेरा त्याच्या सुरक्षेचाही इंचार्ज होता.
सुरुवातीला बॉडीबिल्डर असलेल्या शेराने १९८७ मध्ये मुंबई ज्युनियरचा किताब जिंकला आणि १९८८ मध्ये मिस्टर महाराष्ट्र ज्युनियरमध्ये उपविजेता ठरला, १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला बॉडीगार्ड बनला आणि त्यानंतर लगेचच सलमानच्या सेवेत रुजू झाला.