scorecardresearch

Loksatta Exclusive : ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघेंचा लूक पाहून सलमानही भारावला; प्रसाद ओकला म्हणाला, “भाई क्या…”

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला सलमान खानने हजेरी लावली होती. यावेळी आनंद दिघे यांच्या रुपात अभिनेता प्रसाद ओकला पाहून सलमान अगदी थक्क झाला अन् प्रसादचं त्याने कौतुकसुद्धा केलं.

Dharamveer, Dharamveer Movie, anand dighe,
‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला सलमान खानने हजेरी लावली होती. यावेळी आनंद दिघे यांच्या रुपात अभिनेता प्रसाद ओकला पाहून सलमान अगदी थक्क झाला अन् प्रसादचं त्याने कौतुकसुद्धा केलं.

सध्या सगळीकडेच ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता प्रसाद ओक या चित्रपटामध्ये दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रसादला आनंद दिघे यांच्या रुपात पाहून सगळेच भारावून गेले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळाही भव्यदिव्य होता. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. त्यासोबतच अभिनेता सलमान खान, रितेश देशमुख यांसारखी दिग्गज मंडळी देखील उपस्थित होती. यावेळी सलमानने अभिनेता प्रसाद ओकचं कौतुक केलं.

सलमान खानची पहिली प्रतिक्रिया काय होती?

सलमानने ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावत कार्यक्रमाला चार चाँद लावले. यावेळी सलमानने प्रसादला आनंद दिघे यांच्या रुपात पाहिलं आणि त्याचं तोंडभरून कौतुक सुद्धा केलं. लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये सलमान नेमकं काय म्हणाला हे प्रसादने खुलेपणाने सांगितलं. “मैने उनका फोटो देखा क्या बाप लग रहा है तू. कितना सेम लग रहा है. बवाल करेगी ये फिल्म.” अशा शब्दांमध्ये सलमानने प्रसादचं कौतुक केलं.

आणखी वाचा – “त्याच्या मतावर भाष्य करणारे आपण कोण?” महेश बाबूच्या ‘त्या’ वक्तव्यावर बोनी कपूर यांचा थेट सवाल

सलमाने ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’चा ट्रेलर पाहिला असल्याचं देखील प्रसादने सांगितलं. तसेच या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान सलमाने चित्रपटाचंही भरभरून कौतुक केलं. “पूर्वी ‘धरम वीर’ (Dharam Veer) नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ‘धर्मवीर’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा, जितका ‘धरम वीरला’ मिळाला होता, अशी मी आशा करतो”, असे सलमान खानने यावेळी म्हटलं होतं.

ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर मांडण्याचा दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी पूर्ण प्रयत्न केला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडेच साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan first reaction when he saw prasad oak in anand dighe look for dharamveer movie kmd