‘सन ऑफ सरदार’, ‘आर… राजकुमार’, ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकुल देव यांचं २३ मे रोजी वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झालं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक दिवसांपासून ते आजारी होते.
मुकुल देव स्वतः एक सुप्रसिद्ध अभिनेते होते. तसेच, ते प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता राहुल देवचे भाऊ होते. मुकुल देव यांनी अनेक गाजलेल्या टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर मुकुल यांच्या चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानने सोशल मीडियावर त्याचा दिवंगत सहकलाकार मुकुल देव यांना श्रद्धांजली वाहिली आणि इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यांच्याबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला. अभिनेत्याने त्याच्या शब्दांतून आपले दुःख व्यक्त केले. मुकुल देव यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
श्रद्धांजली वाहताना सुपरस्टार सलमान खानने ट्विटरवर २०१४ च्या ‘जय हो’ चित्रपटात मुकुल यांच्याबरोबर स्क्रीन स्पेस शेअर केलेल्या दोघांच्या चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. सलमानने लिहिले की, मला तुझी आठवण येईल भाऊ. भावपूर्ण श्रद्धांजली!
Miss you my dear brother Mukul
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 24, 2025
Rest In Peace pic.twitter.com/iNsKpPYqxC
सुश्मिता सेननेही वाहिली श्रद्धांजली
त्याच वेळी, मुकुल देव यांच्या ‘दस्तक’ या पहिल्या चित्रपटात त्यांच्याबरोबर काम करणारी अभिनेत्री सुश्मिता सेन हिनेही त्यांच्यासाठी पोस्ट केली आहे. सुश्मिताने इन्स्टा स्टोरीवर मुकुल यांचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “रेस्ट इन पीस, वंडरफुल सोल.”
दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील लोधी स्मशानभूमीत २४ मे रोजी मुकुल यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार झाले. ऑनलाइनद्वारे समोर आलेल्या हृदयद्रावक दृश्यांमध्ये त्यांचा भाऊ राहुल देव शोक करताना दिसला. चाहत्यांनीही अभिनेत्यावर शोक व्यक्त केला.
मुकुल देव यांचा जन्म १७ सप्टेंबर १९७० रोजी नवी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांनी १९९६ मध्ये ‘मुमकिन’ या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नंतर त्यांनी टीव्हीव्यतिरिक्त हिंदी, पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड व तेलुगू या भाषांतील ६० हून अधिक चित्रपटांमधून काम केलं होतं.