बॉलिवूड स्टार सलमान खानने सोमवारी वांद्र्यातल्या भाईजान्स किचनला भेट दिली आणि फ्रंटलाईन वर्कर्सना पुरवल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही स्वतः तपासला. सलमान आणि युवा सेनेचे राहुल कनल या दोघांनी करोना काळात फ्रंटलाईन वर्कर्सना जेवण पुरवण्याची मोहीम सुरु केली आहे.
त्यांच्या ‘भाईजान्स किचन’ या रेस्तराँच्या माध्यमातून जेवण पुरवण्यात येतं. या मोहिमेच्या माध्यमातून सध्या मुंबईतल्या कमीत कमी ५००० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना जेवण पुरवलं जातं. यात पोलीस, आरोग्य कर्मचारी तसंच कन्टेनमेंट झोनमधील नागरिकांचा समावेश आहे. याबद्दल राहुल यांनी सांगितलं की ही मोहीम सलमानच्या परिवाराकडून प्रेरणा घेतल्यानंतर सुरु करण्यात आली. ‘
“सलमानच्या घरातून रोज फ्रंटलाईन वर्कर्सना डबा दिला जायचा.सलमानचे आईवडील डबा पाठवायचे. तेव्हा सलमानने मला सांगितलं की आपण २४ तास फिल्डवर असलेल्यांना आपल्याला ही सुविधा पुरवता येईल असं काहीतरी करायला हवं”, असंही राहुल यांनी सांगितलं.
या मोहिमेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पाकिटात पूर्ण जेवण, बिस्कीटं आणि पाण्याची बाटली असते. सलमानने काल या भाईजान्स किचनला भेट दिली आणि जेवणात चिकन नगेट्स, उकडलेली अंडी, चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी आणि व्हिटमिन सी असलेल्या फळांच्या रसांचाही समावेश करण्याचं सांगितलं.
सलमान लवकरच त्याच्या चाहत्यांना राधे या चित्रपटातून दिसणार आहे. त्याच्या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्याला त्याच्या चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.