Salman Khan on Tere Naam Iconic Hairstyle : नेटफ्लिक्सच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा तिसरा सीझन सध्या खूप चर्चेत आहे. या नवीन सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये सलमान खान खास पाहुणा म्हणून दिसणार आहे. त्यामुळे हा एपिसोड टेलिकास्ट होण्यापूर्वीच चर्चेत आहे.
मजेदार संभाषणादरम्यान सलमान खानने कपिलला सांगितले की, ‘तेरे नाम’ चित्रपटातील त्याचा लूक प्रत्यक्षात कोणापासून प्रेरित होता. सलमान खानचा ‘तेरे नाम’ लूक तरुण मुलांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता. सलमान खानने सांगितले की, त्याची ती हेअरस्टाईल आपले माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यापासून प्रेरित होती.
हेअरस्टाईल अब्दुल कलाम यांच्यापासून होती प्रेरित
सलमान खान म्हणाला, “तेरे नाम’ चित्रपटाचा हा लूक प्रत्यक्षात डॉ. अब्दुल कलाम साहेबांपासून प्रेरित होता. त्यावेळी राहुल रॉयचीही अशीच हेअरस्टाईल होती. मला वाटायचे की, लहान शहरांचे नायक नेहमीच लांब केस ठेवतात. जुन्या काळातील नायकही लांब केस ठेवत होते. माझा तो लूक तिथून आला आहे.”
कपिलच्या शोचा नवीन सीझन व्हिडीओ रिलीज
या एपिसोडदरम्यान, सलमानने आमिर खानच्या गौरी स्प्रॅटबरोबरच्या नवीन नात्यामागील कारणही सांगितले. शोच्या निर्मात्यांनी अलीकडेच एक छोटा व्हिडीओ रिलीज केला आहे, ज्यामध्ये कपिल सलमानला म्हणतो, “आमिरभाईने नुकतीच त्याच्या प्रेयसीची चाहत्यांना ओळख करून दिली आहे. तो थांबणार नाही; पण तुम्ही अजूनही सुरुवात केलेली नाही.”
त्यावर सलमान हसत उत्तर देतो, “आमिर वेगळा आहे. तो एक परफेक्शनिस्ट आहे, जोपर्यंत तो त्याचे लग्न परफेक्ट करत नाही तोपर्यंत…” हे बोलल्यानंतर सर्व जण हसायला लागतात.
व्हिडीओच्या शेवटी, सलमान आणि कपिल ‘प्यार किया तो डरना क्या’ या सुपरहिट चित्रपटातील ‘ओ ओ जाने जाना’ हे हिट गाणे एकत्र गाताना दिसत आहेत. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ३’चा पहिला भाग २१ जून रोजी नेटफ्लिक्सवर सुरू झाला. या शोचा नवीन भाग दर शनिवारी रात्री ८ वाजता प्रसारित होईल.