समय रैना(Samay Raina) होस्ट करीत असलेल्या इंडिया गॉट लेटेंट(India Got Latent)ची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा असल्याचे दिसत आहे. या शोमध्ये पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बीअर बायसेप्स या यूट्यूबर पॉडकास्टच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यामुळे रणवीर अलाहाबादियाचा चाहतावर्गही मोठा असल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वीच रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या इंडिया गॉट लेटेंटमध्ये पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावली होती. यावेळी त्याने एका स्पर्धकाबरोबर बोलताना आक्षेपार्ह टिप्पणी केली. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसले. त्यानंतर रणवीर अलाहाबादिया व समय रैना यांच्याविरोधात तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यांना समन्स बजावण्यात आले. या सगळ्यात समय रैनाने इंडिया गॉट लेटेंटचे सगळे एपिसोड यूट्यूबवरून हटवले होते, त्यानंतर त्याने यूट्यूबवर कोणतीही पोस्ट केल्याचे पाहायला मिळाले नाही. आता मात्र त्याने यूट्यूबवर एक पोस्ट शेअर करीत पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वादानंतर समय रैनाची पहिली यूट्यूब पोस्ट

समय रैनाने त्याच्या यूट्यूबवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्याच्या यूट्यूबचे मेंबर्स असलेल्यांना दिसत आहे. त्याच्या या पोस्टमध्ये त्याने हार्ट इमोजी शेअर केली आहे. त्याने पोस्ट शेअर केल्यानंतर एका मिनिटातच सात हजार लोकांनी लाइक केले, तर २४०० लोकांनी कमेंट केल्या. एका रेडिट युजरने समय रैनाच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करीत लिहिले, “सध्या इंटरनेटवर कोणी इतके मोठे व्यक्तिमत्व आहे का?”, एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की “तो बरा असेल, अशी आशा आहे.”

याबरोबरच समय रैनाने या वादानंतर नुकतीच कॅनडातील शोमध्ये हजेरी लावली होती. या शोला चाहत्यांनी गर्दी केली होती. एका चाहत्याने समय रैनाच्या या शोबद्दल लिहिलेली पोस्ट व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, त्याच्या शोमध्ये जवळजवळ ७०० लोक आले होते. शो सुरू होण्याआधी लोक त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी समय रैनाच्या डोळ्यात अश्रू आले होते. स्टेजवर आल्यानंतर त्याचे पहिले वाक्य होते, माझ्या वकिलांची फी भरल्याबद्दल धन्यवाद. तसेच शोच्या शेवटी त्याने म्हटले की, कदाचित सध्या माझा वेळ खराब चालला आहे, पण लक्षात ठेवा मी समय आहे.”

याबरोबरच बीअर बायसेप्सचा उल्लेख करत समयने म्हटले होते की या कार्यक्रमात असे अनेकवेळा घडेल की, जेव्हा तुम्हाला वाटेल की मी खूप चांगला विनोद करू शकतो, मात्र त्यावेळी बीअर बायसेप्सला आठवा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणवीर अलाहाबादिया व समय रैना हे भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर आहेत. बीअर बायसेप्स असे रणवीर अलाहाबादियाच्या यूट्यूब चॅनेलचे नाव असून त्याच्या पॉडकास्ट शोसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याच्यावर महाराष्ट्रासह आसाममधून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. इंडिया गॉट लेटेंटमधील त्याच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याने माफी मागितली होती. नुकत्याच झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने त्याला अटकेपासून संरक्षण दिले आहे.