आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलिज एंटरटेनमेंटसह नेटफ्लिक्स आणि इतर पक्षांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने या वेबसीरीजच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. १८ सप्टेंबर रोजी वेबसीरीजचे प्रदर्शन करण्यात आले. या सीरीजमध्ये समीर वानखेडे यांच्या सारखे दिसणारे पात्र असल्यामुळे वाद उद्भवला आहे.

“बॅड्स ऑफ बॉलीवूड” सीरीजमधील चित्रण खोटे आणि बदनामीकारक असल्यामुळे त्याविरोधात मनाई आदेश देण्यात यावा, तसेच नुकसानभरपाईच्या स्वरुपात दिलासा मिळावा, अशी मागणी समीर वानखेडेंच्या वतीने करण्यात आली आहे.

समीर वानखेडे यांच्या याचिकेत दोन कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे. ही रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी दिली जाईल, असा प्रस्ताव वानखेडे यांनी ठेवला आहे.

समीर वानखेडेंच्या वतीने कोणती प्रतिक्रिया दिली?

दरम्यान या प्रकरणावर समीर वानखेडे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले की, आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. अभिनेता शाहरुख खान, गौरी खान यांच्या मालकीच्या रेज चिलीज एंटरटेन्मेंट प्रा. लि., ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि अन्य लोकांविरोधात स्थायी किंवा कायमस्वरुपी मनाई आदेश आणि नुकसान भरपाईच्या स्वरुपात दिलासा मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.

वानखेडेंच्या याचिकेत पुढे म्हटले की, रेड चिलिज एंटरटेनमेंट निर्मित आणि नेटफ्लिक्स ओटीटीवर प्रसारित झालेली बॅड्स ऑफ बॉलिवूड ही मालिका अंमली पदार्थ विरोधी अंमलबजावणी विभागाचे विकृत आणि नकारात्मक चित्र सादर करत आहे. ज्यामुळे कायदा आणि या विभागावरून जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो.

याचिकेत पुढे नमूद केले की, आर्यन खानशी संबंधित प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. या संबंधीचा खटला अजूनही मुंबई उच्च न्यायालय आणि मुंबईतील एनडीपीएस विशेष न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या विषयासंबंधीचे चित्रण हे बेजबाबदार आहे.

प्रकरण काय आहे?

२ ऑक्टोबर २०२१ रोजी समीर वानखेडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी असताना त्यांनी आर्यन खानला कॉर्डिलिया या क्रूझवरून अटक केली होती. त्याच्याकडे अमली पदार्थ आढळल्याचा दावा त्यांनी केला होता. अटकेनंतर आर्यन खान याला २५ दिवस तुरुंगात काढावे लागले होते. दरम्यान या कारवाईवर अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले.

संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार नवाब मलिक यांनी ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक प्रकारचा बनाव असल्याचा आरोप केला होता. समीर वानखेडे यांनी सेलिब्रिटींना जाणीवपूर्वक ड्रग्जच्या प्रकरणात अडकवले होते, असाही दावा त्यांनी केला होता.