पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे. शोएब मलिकने एक्स अकाऊंटवरुन त्याच्या तिसऱ्या निकाहचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे शोएबने टेनिसपटू आणि त्याची दुसरी पत्नी सानिया मिर्झाला तलाक देऊन लगेचच तिसरा निकाह केल्याची चर्चा सुरू झाली आहे. सानिया आणि शोएबचं नातं संपुष्टात आलं का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी समाजमाध्यमांवर उपस्थित केला आहे. सानिया मिर्झाने यापूर्वी तिच्या समाजमाध्यमांवरील पोस्टमधून तलाकचा उल्लेख केला होता. परंतु, या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं नव्हतं. तलाकची प्रक्रिया खूप वेदनादायी असते असंही सानियाने म्हटलं होतं.

दरम्यान, सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे की, सानिया आणि शोएबमध्ये ‘खुला’ झाला आहे. या वृत्तानंतर अनेकांना प्रश्न पडला आहे की, ही ‘खुला’ प्रक्रिया काय असते. तलाक आणि ‘खुला’ प्रथेत काय फरक असतो?

इस्लाममध्ये विवाहित महिलेला तलाक घेण्याचा अधिकार असतो. ‘खुला’ ही इस्लाममधील तलाकचीच एक प्रकिया आहे. या अधिकाराअंतर्गत एखादी महिला तिच्या पतीपासून विभक्त होऊ शकते. इस्लाममधील या प्रक्रियेनुसार पती तलाक देतो, तर पत्नी ‘खुला’ मागू शकते. म्हणजेच जेव्हा पतीला पत्नीपासून विभक्त व्हायचं असतं तेव्हा पती तलाक देतो आणि जर पत्नीला पतीपासून विभक्त व्हायचं असेल तर ती ‘खुला’ मागते.

इस्लाममधील पवित्र धर्मग्रंथ कुरान आणि ‘हदीस’मध्येदेखील (धार्मिक ग्रंथ) ‘खुला’ प्रक्रियेचा उल्लेख आढळतो. दिल्लीतल्या फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मोहम्मद मुकर्रम अहमद यांनी ‘खुला’ प्रक्रियेबाबत टीव्ही ९ भारतवर्षला सांगितलं की, इस्लाममध्ये महिलादेखील तिच्या पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेऊ शकते. एखादी विवाहित मुस्लीम महिला दोन साक्षीदारांसमोर पतीपासून विभक्त होण्याची इच्छा व्यक्त करते आणि तिचा पती त्यावर सहमती दर्शवतो या प्रक्रियेला ‘खुला’ म्हटलं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पतीची सहमती नसेल तर पत्नीकडे कोणता पर्याय असतो?

दारुल कुरआन गाजियाबादचे मुफ्ती सलाउद्दीन कासमी म्हणाले, एखाद्या पत्नीला तलाक हवा असेल आणि पती तिला विभक्त होण्याची परवानगी देत नसेल तर ती महिला शरिया न्यायालयात दाद मागू शकते. भारतात अनेक ठिकाणी दारुल कजा आहेत जिथे खुला केला जातो. महिलेच्या विनंतीनंतर काजी तिच्या पतीला बोलावून घेतात. त्यानंतर सुनावणी होते. दोन्ही पक्षांना बोलावून त्यांच्यातला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, वाद मिटला नाही, तसेच पतीने पत्नीच्या खुला देण्याच्या मागणीवर सहमती दर्शवली नाही तर काजी या दोघांना विभक्त करू शकतात.