‘हुमायून’, ‘मदर इंडिया’, ‘आवारा’, अशा अनेक चित्रपटांसाठी दिवगंत अभिनेत्री नर्गिस ओळखल्या जातात. बॉलीवूडमधील त्यांचे योगदान मोठे आहे. अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. जवळपास तीन दशकं त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. ३ मे १९८१ रोजी त्यांचं कर्करोगानं निधन झालं.
हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड मानला जाणारा चित्रपट ‘मदर इंडिया’ मध्ये नर्गिस आणि सुनील यांची मुख्य भूमिका होती. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नर्गिस सुनील यांच्याशी फार बोलत नसत. परंतु, एकेदिवशी चित्रीकरणादरम्यान घडलेल्या घटनेत सुनील यांनी जीव धोक्यात घालून नर्गिस यांचा जीव वाचवला होता. त्यानंतर नर्गिस आणि सुनील यांच्यात मैत्री झाली. त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर नंतर लग्नात झालं. १९५८ साली त्यांनी लग्न केलं. त्यांना तीन मुलंही झाली. संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त.
संजय दत्तला येते त्याच्या आईची आठवण…
आज ३ मे ला, नर्गिस दत्त यांची पुण्यतिथी आहे. अशा प्रसंगी, अभिनेता त्याच्या आईची आठवण करून भावनिक झाला. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या आईबरोबरचे न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. एक फोटो नर्गिस यांचा आहे. एक फोटो कुटुंबाचा आहे. शेवटच्या फोटोमध्ये लहान संजय नर्गिस आणि सुनील यांच्याबरोबर दिसत आहे.
संजय दत्तबरोबर चाहतेही झाले भावुक
आईबरोबरच्या या सुंदर आठवणी शेअर करताना संजय दत्तने कॅप्शनमध्ये लिहिले, “आज तू जरी माझ्याबरोबर नसली, तरी तुझे प्रेम माझ्याबरोबरच आहे. मला तुझी दररोज आठवण येते आई.” अभिनेत्याची भावनिक पोस्ट पाहून त्याचे चाहतेही भावनिक झाले आहेत.
सध्या संजय दत्त मौनी रॉयबरोबर ‘द भुतनी’ या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात दिसत आहे. तो लवकरच ‘बागी ४’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, तो ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसणार आहे.