|| गायत्री हसबनीस

संजय लीला भन्साळी हे नाव प्रेक्षकांच्या कानावर पडते तेव्हा साहजिकच बिग बजेट हिंदी चित्रपट, त्यातला भला मोठा देखावा, नेत्रसुखद वेशभूषा, हृदयस्पर्शी संवाद आणि सूर-ताल-लयीतील संगीत तसेच नृत्य हे चित्र सगळय़ांच्याच नजरेसमोर तरळते. भारतीयच काय आंतरराष्ट्रीय प्रेक्षकही भन्साळींच्या चित्रपटांना हाऊसफुल्ल गर्दी करणार हे समीकरण आतापावेतो घट्ट झाले आहे. आपल्या एकूणच दिग्दर्शकीय कारकीर्दीविषयी बोलताना चित्रपट क्षेत्रात होणारे बदलही भन्साळींना सुखावणारे वाटतात. प्रेक्षक हे अत्यंत सजग आणि हुशार आहेत हे वेळोवेळी सांगणारे भन्साळी चित्रपट हा समाजाचा आरसा असला तरी मी आरसा दाखवणारा दिग्दर्शक नाही तर प्रेक्षकांना आशयातून समृद्ध करणारा दिग्दर्शक आहे, असे म्हणतात.

मध्यमवर्गीय परिवारातून आलेले, हिंदी चित्रनगरीत आपले अढळ असे स्थान निर्माण करणारे व अख्ख्या बॉलीवूडमध्ये आपला वकूब गाजवणारे एकमेव चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि संगीतकार संजय लीला भन्साळी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील किमयागार ठरले आहेत. जिद्दीने आणि मेहनतीने त्यांनी सतत नवीन वैविध्यपूर्ण चित्रपट दिले आणि त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनीही तुडुंब गर्दी केली. ‘‘चरित्रपट साकार करताना ज्या व्यक्ती खूप प्रसिद्ध होत्या त्यांची कथा मांडणं इतकाच माझा विचार नसतो. ज्यांची नावं इतिहासाच्या पानात नाहीत तरीही ज्यांनी खूप मोठे कार्य करून ठेवले आहे व जनमानसात त्यांची ओळखही नाही अशांच्या कथा मला पडद्यावर साकारायला आवडतात,’’ असं मत  संजय लीला भन्साळी व्यक्त करतात.

‘‘मी माझ्या कामातून जे मला पोहोचवायचे आहे ते मनापासून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. माझे बालपण जिथून सुरू झाले तो मोहल्ला आणि त्या वेळेचे ते वातावरण, ती लोकं मी आजही विसरलो नाही त्यामुळे माझ्या कामात दिसणाऱ्या हरएक गोष्टीत त्यांचा वाटा मोठा आहे. माझ्या कल्पनाशक्तीला साकार करण्यासाठी माझ्याहून अधिक माझ्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांचा वाटा कायम मोठा राहिला आहे. रणवीर सिंग, आलिया भट्ट अशा मंडळींसोबत काम करताना मला प्रामाणिकपणे खूप उत्साही वाटले, कारण ही नवी पिढी आहे, त्यांचे नवे विचार आणि नवी शैली ही मंडळी सोबत घेऊन येतात. चांगल्या कलाकाराला फार काही शिकवायची, सूचना देण्याची गरज नसते आणि हे सगळे चांगलेच कलाकार आहेत, यावर मी ठाम आहे. मी काम करत असलेल्या कलाकारांना फक्त हे दृश्य अमुक पद्धतीने कर हे एवढेच सांगू शकतो, बाकी संपूर्ण अभिनय व देहबोलीचा वापर त्यांनाच करायचा असतो. मी कलाकारांना फार कमी सूचना करतो,’’ असं भन्साळींनी स्पष्ट केलं.

भन्साळींचा ‘देवदास’ असो वा आत्ताचा ‘गंगूबाई काठियावाडी’. गेल्या वीस वर्षांत चित्रपटांकडे प्रेक्षकांना खेचून आणण्याचे सामर्थ्य त्यांनी टिकवले आहे हेदेखील विशेष. आपल्या या चित्रपटांचे यश त्यांनी सातत्याने कसे टिकवले? याबदद्ल बोलताना ते म्हणतात, ‘‘चित्रपटाचे यश हे कुठल्याही निर्मात्याला आनंद देणारीच गोष्ट असते, परंतु मी यश साजरे करण्यासाठी इतरांप्रमाणे काही धडपड करत नाही. मी माझ्या कार्यालयातच असतो. माझ्या कार्यालयातील सहकाऱ्यांशी मी हसून खेळून असतो. चित्रीकरणाचा जो आनंद मला मिळतो तो मला सर्वात महत्त्वाचा वाटतो. माझ्यासाठी बॉक्स ऑफिस म्हणजे प्रेक्षकांची गर्दी आणि आनंद आहे. प्रेक्षकांप्रमाणेच समीक्षकही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.’’

कल्पकतेचा वापर याबरोबरीने सामाजिक आणि सांस्कृतिक बदलही भन्साळींच्या चित्रपटाचा एक भाग राहिले आहेत. त्यामुळे चित्रपटाचा अभ्यास करताना या बदलांचा ते स्वत: किती विचार करतात? कलात्मक स्वातंत्र्य कसे घेतात? यावर ते म्हणतात, ‘‘मी माझ्या चित्रपटांतून कायम हेच बोधवाक्य ठेवतो ते म्हणजे कलाकृतीतून माणसाला मिळणारा आदर आणि सन्मान राखणे आणि तो सामान्यांपर्यंत पोहोचविणे. चित्रपटातून कधीच मी काही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला नाही.  मला व्यक्तिरेखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला आवडतात. ‘गुजारिश’सारखा चित्रपट म्हणाल तर हो मला त्यातून एक गोष्ट समाजापर्यंत पोहोचवायची होती ती म्हणजे सन्मानाने जगणं आणि मरणं मनुष्यप्राण्याचा हक्क आहे. पण असंही होतं की, तुमचं म्हणणं कधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं तर कधी नाही. ठरवून असं काही करता येत नाही हेही निश्चित. ‘पद्मावत’ पाहाल तर स्त्रियांच्या सन्मानाकरिता लढणं किंवा ‘बाजीराव मस्तानी’मध्ये मस्तानीच्या सन्मानाकरिता बाजीरावाचं लढणं या गोष्टी माझ्याकरता खूप महत्त्वाच्या राहिल्या. बाजीरावांचं मस्तानीवर प्रेम होतं. म्हणून तिला काही मी वाळीत टाकणार नाही तर तिला मी माझ्या घरात तेवढाच सन्मान देणार जेवढा मी माझ्या पत्नीला देतो ही बाजीरावांची कृती माझ्यासाठी लक्षवेधी होती. आपले प्रेम जगापासून न लपवता बाजीरावाने मस्तानी यांना जो आदर दिला या कृतीनेच मी गहिवरून गेलो. कुटुंबाचा संपूर्ण विरोध पत्करून मस्तानीच्या सन्मानासाठी बाजीराव यांनी जो संघर्ष केला तो मला प्रचंड भावला. एक चित्रपट निर्माता म्हणून माझ्यासाठी कल्पनाशक्ती, दृश्यांची भाषा आणि संगीत अधिक महत्त्वाचे आहे. संगीताकरताही विशेष प्रयोगांचा सपाटा नसतो तर कथा वाचतानाच गाणी मग तसं संगीत माझ्या विचारांना चालना देतं,’’ असं भन्साळी पुढे म्हणाले.

स्त्रीप्रधान चित्रपटांचा काळ

आजही मला अनेकदा विचारण्यात आलं आहे की पुरुषी वर्चस्व असणाऱ्या या चित्रपट क्षेत्रात स्त्रीपात्र असणारा संपूर्ण चित्रपट कसा चालेल? ‘गंगुबाई’च्या वेळेसही याच प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवून मला अनेकांनी तुमचे कास्टिंग चुकले आहे, आलिया ही भूमिका यशस्वी करू शकेल का, असे प्रश्न विचारले होते. पण. मी म्हटलं नाही. असे चित्रपट होणार. स्त्रीप्रधान चित्रपटांचा हा काळ आहे. चित्रपट बदलत आहेत आणि यापुढे बदलत राहातील. प्रयोगशीलता कमी होणार नाही. पण हाही एक बदल फार मोठा आहे की, पुरुषप्रधान संस्कृती जाऊन स्त्रीप्रधान संस्कृती चित्रपट क्षेत्रात उदयाला येते आहे. राज कपूर, बिमल रॉय, व्ही. शांताराम, मेहेबूबसाहेब, चारुदत्ता, सत्यजित रे यांच्या चित्रपटांतूनही किती प्रभावीपणे स्त्री व्यक्तिरेखा प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या आहेत. ‘मदर इंडिया’ ते ‘गंगूबाई काठियावाडी’ अशा चित्रपटांनी ते साध्य केले आहे हे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो.

मराठी संगीताचा मी चाहता आहे. प्रख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम हे माझे गुरू आहेत. ‘राजकमल स्टुडिओ’ला मी आवर्जून भेट देतो. मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम आहे. मराठी चित्रपटांची जादू ही मला नेहमीच आकर्षित करते. चित्रपटच नाही तर मराठी कलाकारही अत्यंत मेहनती आणि कलासक्त आहेत. मध्यंतरी मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहिली जी मला प्रचंड आवडली. सहा वर्षांपूर्वी मी ‘लाल इश्क’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. तशी संधी मिळाली तर पुन्हा एकदा मराठी चित्रपटाची निर्मिती करायला मला नक्कीच आवडेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय लीला भन्साळी