Sanjay Mishra New Apartment : संजय मिश्रा हे हिंदी सिनेविश्वातील एक नावाजलेलं नाव आहे. आपल्या कारकि‍र्दीत संजय मिश्रा यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या संजय मिश्रा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. याचं कारण म्हणजे वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील मढ परिसरात सी-फेसिंग अपार्टमेंट खरेदी केले आहे.

मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, संजय मिश्रा यांनी मढ आयलंडमध्ये ४.७५ कोटी रुपयांचा सी-फेसिंग अपार्टमेंट खरेदी केला. अपार्टमेंटमध्ये १,७०१ चौरस फुटांचा कार्पेट एरिया आणि २०१ चौरस फुटांचा अतिरिक्त डेक एरिया आहे, ज्यामुळे त्याचे एकूण रेरा कार्पेट एरिया १,९०० चौरस फुटांपेक्षा जास्त आहे.

या व्यवहारासाठी मिश्रा यांनी २८.५० लाख स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी रक्कम भरली. हा व्यवहार ११ जुलै २०२५ रोजी झाला असल्याचंही सांगण्यात येत आहे. अभिनेत्याचं हे नवं घर मढ आयलंड येथील रहेजा एक्झोटिका सायप्रस इमारतीच्या १५ व्या मजल्यावर आहे. त्याचबरोबर जुबिन नौटियाल या अपार्टमेंटच्या ३४ व्या मजल्यावर राहतो.

मढ आयलंड आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर बऱ्याच काळापासून बॉलीवूड स्टार्ससाठी एक आवडते ठिकाण आहे. विक्रांत मेस्सी, अर्चना पूरण सिंह आणि पंकज त्रिपाठी सारख्या स्टार्सची येथे घरे आहेत. जवळच्या वर्सोवा परिसरात कार्तिक आर्यन, रोनित रॉय, विवेक अग्निहोत्री आणि आयुष्मान खुराना सारख्या सेलिब्रिटींचीही मालमत्ता आहे. येथील शांत वातावरण आणि समुद्राची दृश्ये हे सेलिब्रिटींना खूप आवडतात.

संजय मिश्रा नुकतेच ‘हीर एक्स्प्रेस’ या चित्रपटात दिसले. या चित्रपटात दिव्या जुनेजा आणि प्रीत कामानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उमेश शुक्ला दिग्दर्शित हा चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ‘हीर एक्स्प्रेस’चे चित्रीकरण ब्रिटनमधील सुंदर ठिकाणी झाले होते.

संजय मिश्रा यांचे करिअर

संजय मिश्रा यांनी १९९१ मध्ये ‘चाणक्य’ या टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर १९९५ मध्ये ‘ओह डार्लिंग! ये है इंडिया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये ३४ वर्षे घालवली आहेत. त्यांनी १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ४० कोटी ते १२५ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.

संजय मिश्रा अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार २’ मध्येदेखील दिसले होते. ‘मसान’, ‘आँखो देखी’, ‘गोलमाल’, ‘वध’, ‘न्यूटन’ आणि ‘टोटल धमाल’ या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ते ओळखले जातात.