Savaniee Ravindrra Talks About Her Wedding Day : सावनी रविंद्र मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायिका आहे. तिने तिच्या सुमधूर आवाजाने अनेकांची मनं जिंकली आहेत. तिला तिच्या घरातूनच गायनाचा वारसा मिळाला. तिच्या आई-बाबांनाही गाण्याची आवड असल्याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे. यासह तिने यामध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दलही सांगितलं आहे.
सावनी रवींद्रने नुकतीच तिच्या नवऱ्याबरोबर ‘अनुरूप विवाह संस्थाला’ मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दलही सांगितलं आहे. परंतु, आश्चर्याची गोष्ट म्हणजे सावनीने लग्नाच्या दिवशी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला चक्क अटी घातल्या होत्या आणि जोवर ती अट तो पूर्ण करणार नाही, तोवर लग्नासाठी स्टेजवर जाणार नाही असं सांगितलेलं.
सावनी रविंद्रने होणाऱ्या नवऱ्याला घातलेल्या ‘या’ अटी
सावनी मुलाखतीत हा किस्सा सांगत म्हणाली, “मी लग्नाच्यावेळी त्याला काही अटी घातल्या होत्या. एक अट अशी होती की लग्नात फेटा घालायचा नाही, कारण मी कुठेतरी एका ब्रँडचे बरेच फेटे पाहिलेत ते मला अजिबात आवडले नाही; कारण ते चांगले दिसत नव्हते, म्हणून मी सांगितलेलं फेटा घालायचा नाही. दुसरी अट अशी होती की, मेहेंदी काढायची नाही, कितीही कोणीही आग्रह केला तरीही. तिसरी, मूल झालं तर ते त्याला बाबाच म्हणणार; डॅडी, पप्पा वगैरे नाही आणि गृहप्रवेशाच्यावेळी फटाके वाजवायचे नाहीत, कारण ते मला आवडत नाही. या अटी होत्या आणि त्याने त्या पूर्ण केल्या.
पुढे सावनीचा नवरा आशीष म्हणाला, “खूप आधीपासूनच कल्पना केलेली असते की लग्नात फेटा घालणारच आणि माझ्या मित्रांनीसुद्धा सांगितलेलं घाल फेटा.” सावनी यावर म्हणाली, “लग्नाच्या दिवशी मला तयार व्हायला वेळ लागला असं काही झालं नाही, मी नीट वेळेत तयार झालेले. आमच्या दोन्ही रूम शेजारीच होत्या. मी तयार होऊन बाहेर आले आणि मला तो दिसला, पण त्याला बघून मी पळत आत गेले. म्हटलं मी येणारच नाही बाहेर, तू पहिला तो फेटा काढ. तो म्हणाला मी काढणार नाही, तेव्हा सगळे लोक थांबलेले. त्याला फेटा काढायला सांगितला, पण त्याने काढला नाही; मग शेवटी मला स्टेजवर जावं लागलं तेव्हा कळलं की, लग्न म्हणजे कोणालातरी माघार घ्यावीच लागते.”
सावनी पुढे म्हणाली, “त्याचंही बरोबर होतं, कारण मुली जसं ठरवतात की लग्नात असं करणार वगैरे तसं मुलंही ठरवत असतील की, त्यांना काय करायचं आहे. त्याचंही आधीच ठरलेलं की त्याला फेटा घालायचा आहे.”