|| नीलेश अडसूळ
पडद्यावर दिसणाऱ्या एखाद्या दृश्यात काही खटकणारे दिसले की पूर्वी कलाकारांची बकोटी धरली जायची. आताही ते होतेच पण हे दृश्य लेखकांनी लिहिलेले असल्याने आता थेट त्यांनाच गाठून टीकेची झोड उठवली जाते. लेखक नवीन काही लिहीत नाही, चौकटीबाहेर पडत नाही असे नाना आरोप सुरूच असतात. मुळात ते सर्जनशील आहेत म्हणूनच त्या ठिकाणी बसले आहेत, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यांनी कितीही काळाच्या पुढचं लिहिलं तरी त्या लिहिलेल्या शब्दांना पडद्यावर दाखवण्याची मान्यता तर मिळायला हवी. बऱ्याचदा कथा मनासारखी निवडूनही पुढे वाहिन्यांच्या सांगण्यामुळे मनाला न पटणारे बदल या लेखकांना करावे लागतात. याचे कारण एकच ‘टीआरपी’. अर्थात त्यांनी हा व्यवसाय म्हणून स्वीकारल्याने त्यांचाही नाइलाज असतो. पण प्रत्यक्षात त्यांची घुसमट होते का की त्यांना या वातावरणाची सवय झालेली आहे किंवा आणखी काही… या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारी ही लेखकांची ‘मन की बात’…
काळाच्या पुढचा विचार पोहोचवण्यासाठी लेखक अपुरे पडतात कारण त्यांना प्रेक्षकांची साथ मिळत नाही, अशी नाराजी लेखिका मुग्धा गोडबोले यांनी व्यक्त केली आहे. ‘लेखक आणि टीआरपी यावर बोलताना दोन्ही बाजूचा विचार व्हायला हवा. टीआरपी ही मालिकेबाबत सत्य परिस्थिती मांडणारी आकडेवारी आहे. त्यामुळे लेखकांना काय वाटते, निर्मात्यांना काय वाटते, वाहिन्यांना काय वाटते यापेक्षा वास्तवात काय दिसते याला प्राधान्य देत टीआरपीच्या दिशेने जावे लागते. हल्ली तर एकएका मिनिटांचा, एकएका प्रसंगांचा टीआरपी आमच्यापर्यंत पोहोचतो. त्यामुळे प्रेक्षकांना कोणता कलाकार, कोणते प्रसंग आवडतात हेही आम्हाला स्पष्ट दिसत असते. त्याकडे दुर्लक्ष करून स्वत:ला काय वाटते याचा रेटा आपण धरू शकत नाही. टीआरपी हा केवळ प्रेक्षकांच्या हातात आहे. एखादी कथा कोणत्या दिशेला न्यायची हे प्रेक्षक ठरवत असतात. त्यामुळे आम्ही आमच्या लेखणीतून याचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतो. पण बऱ्याचदा चांगले काही दाखवायला गेलो की लोक पाठ फिरवतात,’ याची जाणीव त्यांनी करून दिली.
मालिकेत काळाच्या पुढचे काही दाखवायला हवे, ही अपेक्षाच चुकीची आहे. मालिका पाहणारा जो सर्वाधिक वर्ग आहे, त्याला जे आवडते ते आम्ही देत आहोत, असे लेखक अभिजीत गुरू सांगतात. ‘दैनंदिन मालिका या पूर्णपणे लेखकांचे आणि प्रेक्षकांचे माध्यम आहे. जे प्रेक्षकांना आवडते ते आम्ही लिहीत असतो. सर्वसामान्य जनता जे पाहते ते टीआरपी हेरत असतो. सर्वसामान्य महिला, ग्रामीण भागातील लोक नाटक, सिनेमे पाहण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे मालिका हेच त्यांचे मनोरंजन आहे. शहरात सणासुदीला गुलाबजाम खात असले तरी ग्रामीण भागात पुरणपोळ्याच खाल्ल्या जातात आणि त्या प्रेक्षकांसाठी ते पारंपरिकपण जपणे महत्त्वाचे आहे. मालिकेकडे ते शेजारच्या घरातली खिडकी म्हणून पाहतात. त्यामुळे राधिका, गौरी, दीपा या सगळ्या नायिका त्यांना त्यांच्या घरातल्या कुणीतरी वाटतात. त्यापलीकडे जाऊन त्यांच्यावर काही लादायचा प्रयत्न केला तर ते त्यातून बाहेर पडतात,’असा प्रेक्षककलाचा आढावा अभिजीत यांनी मांडला.
‘मनोरंजन आणि बोधात्मक मनोरंजन असे दोन प्रकार केले तर मालिकेतून केवळ मनोरंजन होते. अशावेळी त्यातून काहीतरी बोध व्हावा ही अपेक्षा प्रेक्षकांना असते परंतु प्रत्येक वेळी तसा बोध घडवून देणे लेखक म्हणून आमच्यासाठी आव्हानात्मक असते. त्यामुळे जेव्हा प्रेक्षकांची नाराजी येते तेव्हा ती आम्ही स्वीकारतोही. एखादा प्रसंग जेव्हा आम्ही लिहितो तेव्हा त्याचे काय परिणाम होणार, याची कल्पना असते. एखादी कथा पुढे कुठेतरी गोड समारोपाकडे न्यायचीच असते, पण मधला अवकाश भरून काढण्यासाठी त्यात नाट्य निर्माण करावे लागते. हे करण्यासाठी लेखकाची किती तारांबळ होते याची कुणालाही कल्पना नसते. त्यामुळे आमच्यावर टीका करण्याआधी आमच्या जागेवर येऊन पाहा मग कळेल,’ असे मनोगत लेखिका सुखदा आयरे यांनी व्यक्त केले.
प्रेक्षक जबाबदार…
मालिका सुरू होतानाच ती ठरावीक भागांचा अंदाज घेऊन सुरू केली जाते. पंधरा वीस भागांनंतर लोकांना ती क शी पाहायची आहे याचा अंदाज येतो आणि त्यानंतर मालिका खुलत जाते. इथे लेखकाने मनमानी केली तर निर्मात्यांचे नुकसान होईल, जे अत्यंत गैर आहे. त्यामुळे हे प्रेक्षकाभिमुख माध्यम आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा ज्या मालिकांना अतोनात शिव्या दिल्या जातात तीच मालिका टीआरपीवर सर्वाधिक लोकप्रिय ठरत असते, अशावेळी त्याला पुस्ती जोडणे आम्हालाही बंधनकारक असते. रंजक नाट्य दाखवले की निंदा करायची आणि साधे काही दाखवले की पाठ फिरवायची अशी प्रेक्षकांची बाजू असल्याने लेखक म्हणून समतोल साधणे कठीण जाते.
मुग्धा गोडबोले टीकेला महत्त्व नाही…
प्रेक्षक पात्राच्या प्रेमात पडतात. त्यामुळे कथा रंगवताना पात्र खुलवण्याचा अधिक विचार करावा लागतो. सर्वसामान्य माणसांच्या त्या पात्राकडून काही अपेक्षा असतात. चांगुलपणा, काहीसे सोशिक असणे, सगळ्यांना जिव्हाळा देणे, सामावून घेणे हे गुण त्यांना आवडतात. आजच्या पिढीला हे बोगस वाटत असले तरी ‘माझी सासू, जाऊ माझ्याशी वाईट वागूनही आम्ही चांगलेच वागत होतो,’ असे आपली आई म्हणतेच की. म्हणजे मालिकेच्या प्रेक्षकांना जे आवडते आहे ते दाखवले जात आहे आणि जवळपास ८० टक्के प्रेक्षकवर्गाला हेच पाहायला आवडते. समाज माध्यमांवरून मालिकांना शिव्या घातल्या जातात. पण समाज माध्यमांवर लिहिणारा हा केवळ त्या कुटुंबातील एक व्यक्ती असतो. उर्वरित सर्व कुटुंब मालिका नित्याने पाहतच असते. त्यामुळे अशा टीकांकडे दुर्लक्ष करता यायला हवे. दुर्दैवाने वेगळ्या धाटणीच्या मालिका फारशा यशस्वी झालेल्या नाहीत हे वास्तव आहे, जे आपण स्वीकारायला हवे.
अभिजीत गुरू व्यवसाय म्हणून स्वीकारताना…
एखाद्या माध्यमात तुम्ही येताना तिथल्या अपेक्षा, गरजा, चढउतार सगळ्याचा विचार करूनच यावे लागते. डॉक्टर झाल्यावर मला रक्ताची भीती वाटते अशी तक्रार करण्याला काहीच अर्थ नसतो. लेखन हा व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर मालिकेत अशा पद्धतीचा आशय लिहावा लागणार याची पूर्ण जाणीव आम्हाला असते. लेखक म्हणून ज्या माध्यमाची जी गरज आहे ते तुम्ही लिहीत असता. त्यामुळे कोण काय बोलते, किती टीका होतात याला महत्त्व राहत नाही. किंबहुना अशावेळी तक्रार करणेही चुकीचे आहे.
मधुगंधा कुलकर्णी टीका करा पण…
प्रेक्षकांनी खुशाल टीका करावी, पण ती व्यक्तिगत करू नये. तुम्ही आमचे प्रेक्षक आहात, तुमच्या मतांचा आम्हाला पूर्णत: आदर आहे. पण आमच्या वैयक्तिक आयुष्यावर टोकाची टीका करण्याचा काहीही अधिकार नाही. आम्ही आमच्या बाजूने सर्व मर्यादा पाळून, प्रेक्षकांना आवडेल तेच लिहीत असतो.
सुखदा आयरे