अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या ‘बँग बँग’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून बॉलिवुडमधील कलाकारांना वेगवेगळे स्टंटस करण्याचे आव्हान देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून त्याने बॉलीवूड सेलिब्रेटींना आव्हान देण्यास सुरुवात केली. ह्रतिकने नुकतेच बॉलिवूड किंग शाहरूख खानला एट पॅक अॅब्ज बनविण्यासाठी वापरलेल्या व्यायामप्रकारापैकी स्वत:चा आवडता व्यायामप्रकार प्रेक्षकांसमोर करून दाखविण्याचे आव्हान दिले होते.


शाहरूखनेही हे आव्हान स्विकारत, त्याच्या आवडत्या व्यायामप्रकाराचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ‘हॅपी न्यू इयर’ या आगामी चित्रपटासाठी शाहरूखने एट पॅक अॅब्स असलेली शरिरयष्टी बनवली होती. प्रशांत सावंत या आपल्या प्रशिक्षकाबरोबर शाहरूखने शरिरावर मेहनत घेत परिश्रमांची पराकाष्टा केली होती.

या व्हिडिओबरोबर शाहरूखने ह्रतिकला उद्देशून, “डुग्गू, आशा करतो, बँग बँग आव्हान यशस्वीपणे पूर्ण झाले असेल” असा संदेशही दिला आहे.   यापूर्वी हृतिकने बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राला त्याने हील्स असलेली सॅण्डल घालून हॅण्डस्टॅण्ड आणि पुशअप्स् मारण्याचे आव्हान दिले होते. धीट आणि जिद्दी प्रियांकानेही ते आव्हान स्वीकारत आपल्या फेसबुक पेजवर त्याचा व्हिडिओ शेअर केला होता.