Shahrukh khan injured at the set of his upcoming film king : सिद्धार्थ आनंद यांचा ‘किंग’ हा चित्रपट बॉलीवूडमधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण, त्याच्या मजबूत स्टारकास्ट आणि इतर बातम्यांमुळे तो सतत लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
शाहरुख खान हा बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. तो त्याच्या चित्रपटांसाठी कठोर परिश्रम करण्यासाठी ओळखला जातो. तो प्रत्येक दृश्यात त्याचे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला अनेक वेळा दुखापतही झाली आहे.
आता बातमी येत आहे की, चित्रपटाच्या सेटवर शाहरुखला दुखापत झाली आहे. ‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये एका जबरदस्त अॅक्शन सीनचे शूटिंग करणाऱ्या शाहरुख खानचा अपघात झाला, ज्यामुळे तो जखमी झाला.
‘किंग’च्या सेटवर शाहरुख खान जखमी
सूत्रांनी पुढे सांगितले, “दुखापतीबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही; परंतु शाहरुख त्याच्या पथकासह तत्काळ करण्याच्या उपचारांसाठी अमेरिकेला गेला आहे. त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. उलट स्टंट करताना त्याच्या स्नायूंना दुखापत झाली आहे.”
चित्रपटात कोणते कलाकार दिसणार?
या चित्रपटात शाहरुख खान, सुहाना खान, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, जयदीप अहलावत, अनिल कपूर, अभय वर्मा आणि इतर कलाकार आहेत. आता, अलीकडच्याच एका वृत्तानुसार शाहरुख आणि सुहाना लवकरच स्कॉटलंडमध्ये त्यांचे शूटिंग सुरू करणार आहेत.
चित्रपटाचे चित्रीकरण कधी सुरू होणार?
सूत्रांनी असेही सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर शाहरुखला कामापासून एक महिन्याचा ब्रेक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, अहवालात असे म्हटले आहे की, किंग खानचे पुढील वेळापत्रक आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. कारण- शाहरुखला बरे होण्यासाठी काही वेळ सुट्टी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्यानंतर तो पूर्ण ताकदीनं सेटवर परतेल.”
रिपोर्ट्सनुसार, जुलै ते ऑगस्ट या कालावधीत फिल्मसिटी, गोल्डन टोबॅको व वायआरएफ येथे ‘किंग’च्या विविध भागांच्या चित्रीकरणाचे बुकिंग पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आले आहे. ‘किंग’चे चित्रीकरण भारत आणि युरोपमध्ये होणार आहे.
चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानला दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘डर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाली होती. १९९३ मध्येही एका शूटिंगदरम्यान अभिनेत्याच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती. ‘कोयला’ चित्रपटाच्या सेटवरही शाहरुखला दुखापत झाली होती.
त्याच वेळी ‘शक्ती’ चित्रपटाच्या आयटम नंबर ‘इश्क कमिना’दरम्यान, शाहरुखला पाठीला दुखापत झाली होती. त्यासाठी अभिनेत्यावर यूकेमधील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याशिवाय ‘दुल्हा मिल गया’ चित्रपटातील एका अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान शाहरुखच्या डाव्या खांद्यालाही दुखापत झाली होती.