माणसाचं वयंच सर्वकाही ठरवतं अशी जर कोणाची धारणा असेल तर अभिनेता शाहरुख खान आणि आमिर खान हे कलाकार त्याला अपवाद आहेत असेच म्हणावे लागेल. वयाच्या पन्नाशीचा आकडा गाठूनही या कलाकारांचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काही बदललेले नाहीत हे अनेकजण जाणतातच. शाहरुख आणि आमिर खान यांचा असाच एक हटके लूकमधला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये दोन्ही कलाकारांच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाचा काही लवलेशही दिसत नाहीये. या दोन्ही खान अभिनेत्यांचा हा फोटो गाजतोय तो म्हणजे एका बर्थडे पार्टीच्या निमित्ताने. दुबईमध्ये व्यावसायिक अजय बिजली यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी या दोन्ही कलाकारांनी या बर्थडे बॅशला हजेरी लावली होती.
या पार्टीमध्ये आमिरचा त्याच्या आगामी चित्रपटातील पात्राच्या जवळ जाणारा लूक पाहायला मिळाला. तर शाहरुखही त्याच्या नेहमीच्याच चार्मिंग लूकमध्ये दिसत होता. दरम्यान, शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे आमिरसोबतचा त्याचा फोटो ट्विट करताना लिहिले आहे की, ‘गेल्या २५ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतोय, पण हा आमचा एकत्र काढलेला पहिलाच फोटो आहे…’ शाहरुखच्या या कॅप्शननेही अनेकांचेच लक्ष वेधले आहे.
Known each other for 25 years and this is the first picture we have taken together of ourselves. Was a fun night. pic.twitter.com/7aYKOFll1a
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 10, 2017
अभिनेता शाहरुख खान आणि आमिर खान यांचा चाहता वर्ग आणि त्यांची अभिनय शैली नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान लवकरच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या आगामी चित्रपटासाठी पिळदार मिश्या, दाढी आणि डोक्यावर लाल रंगाची पगडी बांधलेला आमिरचा पंजाबी लूक यात पाहावयास मिळतोय. या लूकविषयी बोलतना आमिर म्हणाला की, ठग्स…. मधील माझी शरीरयष्टी कुस्तीपटूच्या शरीरयष्टीप्रमाणे म्हणजे भारदस्त आणि भरलेले खांदे असा नसणार. यात माझा सडपातळ बांधा असलेला लूक प्रेक्षकांना पाहावयास मिळेल. हा चित्रपट फिलीप मिडॉज टेलर याच्या ‘कन्फेशन ऑफ अ ठग’ या पुरस्तकावर आधारित असून याचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करणार आहेत. आमिरप्रमाणेच सध्या किंग खान चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या ‘रईस’ या चित्रपटामुळे. राहुल ढोलकिया दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर शाहरुख लवकरच इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये तो अनुष्का शर्मासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.