Shalmali Kholgade Lovestory : शाल्मली खोलगडे ही लोकप्रिय गायिका आहे. तिने आजवर मराठीसह हिंदीतही अनेक गाणी गायली आहेत. तिने ‘बलम पिचकारी’, ‘पिया के बाजार में’, ‘अगं बाई’, ‘शायराना’ अशी अनेक गाणी गायली आहेत, त्यामुळे तिचा चाहतावर्गही मोठा असल्याचं दिसतं. अनेकांना तिच्या गाण्यांतून प्रेमात पाडणाऱ्या शाल्मलीने नुकतंच तिच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे.

शाल्मलीने संगीतकार फरहान शेखसह २२ नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांचा अंतरधर्मीय विवाह असून यासाठी त्यांना त्यांच्या घरच्यांची परवानगी कशी मिळाली, त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या आणि त्यांची प्रेमकहाणी नेमकी कशी आहे, याबद्दल सांगितलं आहे. दोघांनी नुकतीच ‘हॉटरफ्लाय’ला मुलाखत दिली आहे.

‘अशी’ आहे शाल्मली खोलगडेची प्रेमकहाणी

मुलाखतीत फरहान म्हणाला, “आमचा एक ग्रुप होता, ज्यात सगळे गायक, संगीतकार असे लोक होते. आम्ही एकमेकांचे मित्र होतो, पण कधी असं डेट वगैरे करायचं किंवा रिलेशनशिपबद्दल विचार केला नव्हता.” शाल्मली पुढे म्हणाली, “काही वेळानंतर आमचं नातं खुलत गेलं. स्टँडअप कॉमेडी आम्हाला दोघांनाही खूप आवडतं. त्याने मला कधीच फुलं वगैरे दिली नाहीत आणि मला ते खूप आवडलं, तो खूप साधा होता.”

मुलाखतीत फरहान म्हणाला, “ती एरवी साधे कपडे परिधान करते, पण ती जेव्हा मला भेटायला यायची तेव्हा ड्रेस वगैरे घालून यायची. माझ्यासाठी काही पदार्थ बनवायची, मी काहीही बोललो तरी हसायची; तेव्हा मला कळलं होतं की इथे काहीतरी वेगळं आहे.” शाल्मली पुढे म्हणाली, “आमची पहिली डेट पण फार वेगळी होती. आम्ही कोविडमध्ये एकत्र राहत होतो. जेव्हा दिवस रात्र तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर असता तेव्हाच मला जाणवलेलं की हीच ती व्यक्ती आहे.”

या जोडीने पुढे पहिल्यांदा ते एकमेकांच्या कुटुंबीयांना कसे भेटले याबद्दल सांगितलं आहे. फरहान याबद्दल म्हणाला, “जेव्हा मी पहिल्यांदा तिच्या वडिलांना भेटलो, ती भेट खूप छान होती. त्यांनी पहिल्या भेटीतच मला बिअर पिणार का असं विचारलं.” शाल्मलीने पुढे तिच्या सासुबाईंना पहिल्यांदा भेटल्याची आठवण सांगितली आहे. ती म्हणाली, “मी दुबईत होते एका कार्यक्रमासाठी, तेव्हा माझी त्यांच्याबरोबर भेट झाली आणि आमची भटेसुद्धा खूप छान होती.”

अंतरधर्मीय लग्नाबद्दल प्रतिक्रिया

फरहान पुढे म्हणाला, “माझं कुटुंब आणि हीचं कुटुंब दोन्ही खूप पुढारलेल्या विचारांचे आहेत. आमच्या दोघांच्याही कुटुंबातून कोणीही आम्हाला विरोध केला नाही की तुम्ही कसं करू शकता. धर्मांतर तरी करायला पाहिजे वगैरे असं कधीच कोणीच बोललं नाही.”

शाल्मलीने पुढे सांगितलं की, त्यांनी खूप साध्या पद्धतीने लग्न केलं असून त्या दिवशी त्यांनी खास दोऱ्याच्या वरमाळा बनवल्या होत्या, ज्यामध्ये त्यांचे काही खास फोटोही होते. शाल्मली व फरहानच्या लग्नाला त्या दोघांच्याही घरून कोणीही विरोध केला नसून सगळे खूप आनंदी होते आणि अगदी साध्या पद्धतीने त्यांनी लग्न केल्याचं सांगितलं आहे.