बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. एवढंच नाही तर शमिताच्या वाढदिवशी राकेशनं तिला खास सरप्राइजही दिलं. पण त्याआधी शमितानं बिग बॉसच्या घरात असताना या वर्षी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच जेव्हा बिग बॉसमध्ये पंडित जनार्दन यांनी हजेरी लावली होती, तेव्हा तिनं लग्नाबाबत काही सल्लेही घेतले होते. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शमितानं राकेशसोबत लग्न करण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शमिता शेट्टी जास्तीत जास्त वेळ राकेश बापटसोबत व्यतित करताना दिसत आहे. दोघांनाही सातत्यानं मुंबईमध्ये एकत्र स्पॉट केलं जात आहे. अलिकडेच ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शमितानं तिचं रिलेशनशिप स्टेटस आणि लग्नाच्या प्लानिंगवर भाष्य केलं. शमितानं या मुलाखतीत लग्न करून आयुष्यात सेटल होण्याची तसेच आई होण्याची इच्छा व्यक्त केली.

शमिता शेट्टी म्हणाली, ‘माझी इच्छा आहे की लवकरच लग्न करावं. करोनाच्या काळात एकटेपणा किती भयंकर असू शकतो याची मला जाणीव झाली. मागच्या बऱ्याच काळापासून मी सिंगल आहे. मला माझ्या पद्धतीनं माझं आयुष्य जगायला आवडतं. पण करोनाच्या काळात मला पार्टनरची कमतरता जाणवली. सुदैवानं आता माझ्याकडे एक पार्टनर आहे. मी खूप खूश आहे. पाहूयात आता काय घडतं पुढे. पण मला लग्न करायचंय, आई व्हायचंय आणि कामही करायचं आहे.’

राकेश बापटसोबतच्या नात्यावर शमिता शेट्टी म्हणाली, ‘मला त्याला आणखी जाणून घ्यायचंय. मी त्याच्यासोबत भविष्याचा विचार करतेय. मी जेव्हा बिग बॉस १५ मध्ये सहभागी झाले तेव्हा राकेशपासून दूर होते. अशावेळी ४ महिने एखाद्या व्यक्तीपासून दूर जाण्यासाठी खूप असतात. बिग बॉसच्या घरात असताना माझ्या मनात ‘खरंच राकेश अजूनही माझा बॉयफ्रेंड आहे का?’ असा विचार येत असे. जेव्हा तुम्ही अजिबात संपर्कात नसता त्यावेळी असे विचार येणं सहाजिक आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शमिता पुढे म्हणाली, ‘राकेश आणि माझ्यातलं बॉन्डिंग खूपच चांगलं आहे. जेव्हा मी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले त्यावेळी मला समजलं की तो खरंच माझी वाट पाहतोय. आम्ही दोघंही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी त्याला एका गेम शोमध्ये भेटले होते. जिथे खूप वेगळं जग असतं. पण आता मला बाहेरच्या खऱ्या जगात तो कसा आहे हे जाणून घ्यायचंय. मी सर्व गोष्टींचा सकारात्मकपणे विचार करत आहे. आमचं भविष्य एकत्र असावं अशी माझी इच्छा आहे. सर्व ठीक राहिलं तर आम्ही लवकरच लग्न करू.’