Shefali Jariwala Husband Parag Tyagi Reveal Actress Death Last Day Story : ‘बिग बॉस १३’फेम आणि ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाचे २७ जून रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. तिच्या अचानक निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर अनेक बातम्या आल्या की तिला हृदयविकाराचा झटका आला होता, तर काहींनी असा दावा केला की रिकाम्या पोटी अँटी-एजिंग इंजेक्शन्स घेतल्याने शेफालीचा मृत्यू झाला. आता अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर जवळजवळ अडीच महिन्यांनी तिचा पती, अभिनेता पराग त्यागीने त्याच्या आणि पत्नीच्या नावाने एक पॉडकास्ट सुरू केला आहे, ज्यामध्ये पहिला व्हिडीओ शेअर केला आहे.

या पॉडकास्टमध्ये पराग त्यागीने स्वतः त्याची पहिली मुलाखत दिली, ज्यामध्ये शेफालीशी झालेल्या पहिल्या भेटीपासून ते तिच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची माहिती उघड केली. त्याने शेफालीच्या मृत्यूच्या रात्री काय घडले होते हे देखील सांगितले.

पराग म्हणाला, “मला असं वाटत होतं की काहीतरी घडणार आहे. जसे की सिम्बा (त्यांचा कुत्रा) आजारी पडेल किंवा काहीतरी घडेल. मला आठवते की आम्ही दिवसा देवीची पूजा केली होती आणि मी इमारतीत प्रवेश करत असताना तिने मला एक काम करायला सांगितले. आज पूजा होती, त्यामुळे राम (घरकाम करणारा) थकला आहे म्हणून तू सिम्बाला फिरायला घेऊन जा असं ती मला म्हणाली.”

तो पुढे म्हणाला, “मी म्हणालो, ‘ठीक आहे, मी त्याला घेण्यासाठी वर येईन.’ मग शेफाली म्हणाली, ‘नाही, नाही, मी एक काम करते. मी रामला पाठवते. तो त्याच्या मित्रांशी बोलेल आणि तू सिम्बाला फिरायला घेऊन जा आणि नंतर वर ये.’ मी म्हणालो, ‘ठीक आहे.’ रामने सिम्बाला आणल्यानंतर फक्त तीन-चार मिनिटांनी मला पुरुष कंपाउंडरचा फोन आला, ‘भाऊ, दीदीला काहीतरी झालं आहे.’ मी लगेच सिम्बाला घेऊन पळत सुटलो.”

पराग म्हणाला, “तिला थोडासा श्वास घेण्यास त्रास होत होता आणि ती बेशुद्ध पडली होती. मग जेव्हा मी पाहिले की रक्तदाब कमी तर झाला नाही ना, म्हणून मी तिला थोडे इलेक्ट्रोलाइट पाणी देण्याचा प्रयत्न केला. नंतर… थोडासा सीपीआर दिला. मग आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. मी डोळ्यातील पडदा तपासला, प्रथम मला नाडी दिसली, ती तिथे होती पण डोळ्यातील पडदा नव्हता. तरीही नाडी आणि श्वासोच्छ्वासाचा आवाज दोनदा ऐकू आला. मी तिला उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. मग आम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तेव्हा त्यांनी तिला मृत घोषित केले.”