Shilpa Shetty Bastian Restaurant : शिल्पा शेट्टी आणि तिचे कुटुंब कठीण काळातून जात असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी ६० कोटींच्या फसवणुकीचे आरोप झाले होते. त्यानंतर आता शिल्पाने बॅस्टियन रेस्टॉरंट बंद करत असल्याची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्री भावूकही झाली.

मंगळवारी (२ सप्टेंबर), शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर तिच्या चाहत्यांसह आणि फॉलोअर्ससह ही बातमी शेअर करण्यासाठी एक लांबलचक पोस्ट शेअर केली. तिने लिहिले, “या गुरुवारी एका युगाचा अंत झाला आहे, कारण आम्ही मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक, बॅस्टियन वांद्रेला निरोप देत आहोत. ज्या ठिकाणाने आम्हाला असंख्य आठवणी, अविस्मरणीय रात्री आणि क्षण दिले, ज्याने शहराच्या नाईटलाइफला आकार दिला, आता तो शेवटच्या टप्प्यात आहे. “

शिल्पाने पुढे लिहिले आहे की, या प्रतिष्ठित जागेचा सन्मान करण्यासाठी आम्ही आमच्या जवळच्या ग्राहकांसाठी एक अतिशय खास संध्याकाळ आयोजित करत आहोत – एक रात्र जी जुन्या आठवणी, ऊर्जा आणि जादूने भरलेली असेल, बॅस्टियन वांद्रेला निरोप देईल, पण गुरुवारी रात्रीची आमची नेहमीची परंपरा आर्केन अफेअर पुढील आठवड्यात बास्टियन अॅट द टॉप येथे सुरू राहील, नवीन अनुभवांसह एका नवीन अध्यायात वारसा पुढे नेईल,” असे अभिनेत्रीने लिहिले होते.

बॅस्टियन वांद्रे हा अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रेस्टॉरंट मालक रणजित बिंद्रा यांचा भागीदारी प्रोजेक्ट आहे. हे रेस्टॉरंट २०१६ मध्ये सुरू झाले होते आणि ते त्याच्या सीफूडसाठी प्रसिद्ध आहे.

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यावर फसवणुकीचा आरोप

काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मुंबईतील एका व्यावसायिकाला कर्ज आणि गुंतवणूक कराराच्या बहाण्याने ६०.४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आणखी एक अज्ञात आरोपी आहे. फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर काही आठवड्यांनंतर ‘बॅस्टियन’ बंद होत आहे.

तक्रारदार दीपक कोठारी यांनी आरोप केला होता की, या जोडप्याने त्यांची ६० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली, ज्यामध्ये शेट्टी आणि कुंद्रा यांची आता बंद पडलेली कंपनी, बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश होता. कोठारी यांच्या मते, त्यांनी व्यवसाय वाढवण्याच्या बहाण्याने २०१५ ते २०२३ दरम्यान ही रक्कम गुंतवली होती. परंतु, वैयक्तिक खर्चासाठी या पैशांचा गैरवापर करण्यात आला. EOW आता या प्रकरणाची चौकशी करत आहे. या तक्रारीनंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी आरोप फेटाळून लावले, ते पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले.