Red Soil Stories Shirish Gawas Wife Pooja’s Post : शिरीष व पूजा गवस या जोडप्याने कोकणातील पारंपरिक पदार्थ, ग्रामीण संस्कृतीचं दर्शन संपूर्ण जगाला ‘रेड सॉईल स्टोरीज’ या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घडवलं होतं. मात्र, ऑगस्ट महिन्यात शिरीषचं आकस्मिक निधन झाल्याची बातमी समोर येताच कोकणवासीयांसह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. शिरीष आयटी क्षेत्रात कार्यरत होता. करोनामुळे दोघेही सिंधुदुर्गातील आपल्या मूळ गावी परतले होते. याचठिकाणी दोघांनी ‘रेड सॉईल स्टोरीज’ हे युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं.
Red Soil Stories हे चॅनेल सुरू केल्यावर शिरीष-पूजाच्या व्हिडीओला हळुहळू चाहत्यांची पसंती मिळू लागली. त्यांच्या चॅनेलचे आजच्या घडीला लाखो सबस्क्राइबर्स आहेत. शिरीषच्या निधनानंतर या चॅनेलचं पुढे काय होणार? हे चॅनेल या जोडप्याने खूप कष्ट घेऊन लाखो लोकांपर्यंत पोहोचवलं होतं…त्यामुळे मध्यंतरीच्या काळात नेटकरी कायम पोस्ट लिहून, विविध व्हिडीओजवर कमेंट्स करून Red Soil Stories पुन्हा एकदा सुरू कर असा सल्ला पूजाला देत होते. आता पूजाने आपल्या पतीचं हे स्वप्न त्याच जोमाने पुढे न्यायचं असा निर्णय घेतला आहे.
शिरीषच्या निधनानंतर पूजाने सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. “आपण कायमच आम्हाला खूप प्रेम आणि सपोर्ट देत राहिलात असेच कायम पाठीशी राहा” असं पूजाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच Red Soil Stories हे चॅनेल पुन्हा सुरू केलं आहे.
पूजाच्या पोस्टवर मराठी कलाविश्वातील कलाकारांसह अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी कमेंट्स करत तिला पाठिंबा दिला आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता लिहिते, “मी कायम तुझ्यासोबत असेन” तर, हास्यजत्रा फेम वनिता खरातने, “आम्ही सगळे तुझ्या पाठिशी आहोत…” असं कमेंट्समध्ये म्हटलं आहे. “तू लढ आम्ही आहोत”, “नक्कीच कायम सपोर्ट असेल”, “पूजा खूप स्ट्राँग राहा आम्ही आहोत” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत. याशिवाय स्पृहा जोशी, मधुरा रेसिपीज, आरती वडगबाळकर यांनीही पूजाच्या पोस्टवर कमेंट्स करत तिला पुढील प्रवासासाठी पाठिंबा दिला आहे.

पूजाने व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शिरीषला जुलै महिन्यात अचानक फिट आली होती आणि त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात त्याचं निधन झालं. त्याला ब्रेन ट्यूमर झाला होता. शिरीष मुंबईत नामांकित कंपनीत कामाला होता. तर पत्नी पूजा गवस चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत होती. मात्र, करोनानंतर हे दोघंही गावी स्थायिक झाले होते. आता पूजाने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टवर Red Soil Stories चे चाहते, फॉलोअर्स तसेच अन्य इन्फ्लुएन्सर्सनी आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा कमेंट्स करत तिला बळ दिलं आहे.