एक चरित्रपट प्रदर्शित झाला नाही तोवर दुसऱ्या चरित्रपटाची तयारी करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलीवूडची सध्याची सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. श्रद्धाचे यावर्षीचे चित्रपट वैविध्यपूर्ण होते तरीही ते चालले नाहीत मात्र म्हणून तिची घोडदौड थांबलेली नाही. एकापाठोपाठ एक चांगले चित्रपट तिच्या वाटय़ाला येत आहेत. तिचा बहुचर्चित ‘हसीना पारकर’ हा चरित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होईल. त्यामुळे एकीकडे या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमांचे वेळापत्रक सांभाळत ती आगामी दोन चित्रपटांवर काम क रते आहे. त्यातला एक म्हणजे बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ज्यात श्रद्धा सायनाच्या भूमिकेत दिसणार आहे. आणि तिच्या ‘साहो’ची चर्चा सध्या जगभर आहे. अनुष्का शेट्टीच्या हातून सुटलेला ‘साहो’ बॉलीवूडच्या सगळ्या अभिनेत्रींकडे फिरून श्रद्धापर्यंत पोहोचला आहे. प्रभास आणि तिच्या या चित्रपटावर कित्येकांच्या नजरा रोखलेल्या आहेत. या सगळ्याची जाणीव असलेली श्रद्धा सध्यातरी एकापेक्षा एक चांगल्या चित्रपटात व्यग्र असल्याने खूश आहे!

आत्तापर्यंत ग्लॅमरस भूमिकांमध्येच श्रद्धा कपूरला पाहिलेले असल्याने तिने ‘हसीना पारकर’ हा चरित्रपट स्वीकारल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले होते. ‘हाफ गर्लफ्रेंड’ करत असतानाच श्रद्धाने तिला ग्लॅमरस भूमिका करायला आवडतात, असं सांगितलं होतं. कुख्यात गँगस्टर दाऊदची बहीण हसीनाच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटासाठी विचारणा झाली तेव्हा ही भूमिका ग्लॅमरस आहे की नाही हा विचारच शिवला नव्हता. मुळात, या चित्रपटाची माहिती आपल्याला भाऊ सिद्धांतकडून मिळाली होती, असं श्रद्धाने सांगितलं. ‘हसीना पारकर’साठी दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी पहिल्यांदा श्रद्धाचा भाऊ सिद्धांत कपूरची निवड केली होती. सिद्धांतनेच या चित्रपटाविषयी माहिती दिली आणि मग दिग्दर्शक हसीनाचे छायाचित्र आणि पटकथा घेऊन भेटायला आले. सुरुवातीला या चित्रपटाबद्दल मी फारशी उत्सुक नव्हते, एक दडपण आलं होतं, पण मी हसीनाच्या भूमिकेसाठी फिट आहे याबद्दल अपूर्व लाखियांना प्रचंड विश्वास होता. त्यांचा विश्वास बघूनच चित्रपट करण्यासाठी होकार दिला, असं ती सांगते. या चित्रपटात हसीनाच्या तरुणपणाबरोबरच थोडीशी वयस्कर भूमिकाही तिला करावी लागली आहे. ज्यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रॉस्थेटिक मेकअपचा वापर करण्यात आला आहे. त्याबद्दल बोलताना हसीनाचा हा काळ रंगवणं थोडं आव्हानात्मक होतं असं तिने सांगितलं. मध्यमवयीन हसीना साकारण्यासाठी बॉडीसूट वापरावा लागला आणि माझ्या तोंडात सिलिकॉन प्रॉस्थेटिक असायचं. दर दिवशी तो सगळा साज चढवण्यासाठीच पाऊण तास लागायचा. आणि मेकअप पूर्ण झाला की बोलणं कठीण व्हायचं, पण जसजसा सराव झाला तशा सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या, असं ती म्हणते. याआधी कधी हसीनाशी भेट झाली होती का?, यावर त्यांना कधीच पाहिलं नव्हतं. मात्र त्यांच्या कुटुंबियांना अनेकदा भेटणं झालं, असं तिने सागितलं. त्यांच्या कुटुंबाकडून मला अनेक किस्से, अनेक घटना ऐकायला मिळाल्या. त्याआधारे मी स्वत:च्या नोट्स तयार केल्या. जवळपास तीन पानी प्रश्न आणि शंका घेऊन मी त्यांच्यासमोर बसले होते. त्यांच्याकडून उत्तरं मिळवल्यावर ती माहिती एकत्रित करून माझ्यापरीने ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला, असं ती म्हणते.

‘हसीना पारकर’ या चित्रपटानिमित्ताने ती आणि भाऊ सिद्धांत कपूर पहिल्यांदाच पडद्यावरही भावा-बहिणीच्या भूमिकेत एकत्र दिसणार आहेत. सिद्धांतबरोबर एकत्र काम करताना खूप मजा आली असं सांगणारी श्रद्धा तो एकदम निर्मळ मनाचा आहे, त्याला जे मिळतं तो त्याच्या प्रेमात पडतो. तो खूप चांगला आहे, अशा शब्दांत आपल्या भावाचं कौतुक करते. ‘हसीना पारकर’ प्रदर्शित होतोय पण श्रद्धाला थांबायला बिलकूल वेळ नाही. सध्या ती सायना नेहवालच्या चित्रपटावर काम करते आहे. अमोल गुप्ते या चित्रपटाचं दिग्दर्शन करतायेत. अमोल गुप्तेंचा ‘स्टॅनली का डब्बा’ हा चित्रपट आपला सगळ्यात आवडता चित्रपट आहे, असं तिने सांगितलं. या चित्रपटासाठी श्रद्धाला बॅडमिंटनचं प्रशिक्षण घ्यावं लागलं. आत्तापर्यंत बॅडमिंटनचे ३२ सराव प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. आता हा खेळच मला आवडायला लागला आहे आणि चित्रपट पूर्ण झाला तरी मी हा खेळ पुढे सुरू ठेवणार, असं तिने सांगितलं. एकापाठोपाठ एक चरित्रपट करताना तिला भीती वाटत नाही. उलट सायना आणि माझ्यात बरीचशी साम्यस्थळे आहेत, असं दिग्दर्शक अमोल गुप्ते यांना वाटतं. ते स्वत: एक उत्तम दिग्दर्शक आहेत. आणि सेटवर ते मला एखाद्या लहान मुलीप्रमाणेच वागवतात. प्रत्येक गोष्ट समजावून देतात, सांभाळून घेतात. त्यामुळे हा चित्रपट करताना कुठल्याही प्रकारचं दडपण नाही आहे, असं तिने स्पष्ट केलं. सायना नेहवालच्या चित्रपटाबरोबरच येत्या काही दिवसांत ‘साहो’चं चित्रीकरणही सुरू होईल. प्रभासच्या या चित्रपटाबद्दल मला स्वत:ला खूप उत्सुकता आहे, असं ती म्हणते. ‘साहो’ हिंदी, तेलुगू दोन्ही भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्यातरी ती या चित्रपटासाठी तेलुगू भाषेचे धडे गिरवते आहे. एकीकडे बॅडमिंटनचं प्रशिक्षण आणि दुसरीकडे ‘साहो’ची तयारी ही कसरत सांभाळून स्वत:चं दैनंदिन वेळापत्रक सांभाळण्याचा तिचा अट्टहास आहे. त्यामुळे तिच्या अफेअरविषयीच्या चर्चा किंवा अन्य गोष्टी वाचण्या-ऐकण्यासाठी वेळच नाही, असं ती स्पष्ट करते. सध्या तरी ती आपल्या कामात पूर्णपणे रमली आहे.