गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये क्रीडापटूंच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्याचा ट्रेंड आला आहे. यामध्ये क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, धावपटू मिल्खा सिंग,बॉक्सर एम. सी. मेरी कोम यांचा समावेश आहे. देशाचं नाव असंच उज्ज्वल करणाऱ्या मेरी कोम यांच्या जीवनावर आधारित एखाद्या मालिकेत काम करण्याची इच्छा ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री शुभांगी अत्रेने व्यक्त केली आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकीच नावाजलेली मालिका ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभी या नावाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच तिने टेलीव्हिजन शोच्या निर्मात्यांना मेरी कोमच्या जीवनावर आधारित एखादी मालिका किंवा कार्यक्रमाची निर्मिती करण्याचा आग्रह केला आहे.
‘बॉक्सर मेरी कोम यांच्या बायोपिकची निर्मिती झाली. त्यातून त्यांच्या जीवनक्रम उलगडण्यात आला. मात्र छोट्या पडद्यावरही त्यांच्या जीवनावर आधारित एखाद्या मालिकेची निर्मिती व्हावी आणि त्या मालिकेमध्ये मी त्यांची भूमिका साकारावी’, असं शुभांगी म्हणाली.
पुढे ती असंही म्हणाली, ‘छोट्या पडद्याचा प्रेक्षक वर्ग जास्त आहे. त्यामुळे मेरी कोमसारख्या प्रेरणादायी व्यक्तीवर एखाद्या कार्याक्रमाची निर्मिती झाली तर तरुणवर्गाला त्यातून खूप काही शिकायला मिळेल’,
दरम्यान, ‘भाभीजी घर पर है’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका असून या मालिकेच्या माध्यमातून ‘अंगुरी भाभी’ हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलं. यापूर्वी शिल्पा शिंदे अंगुरी भाभीच्या भूमिकेत झळकली होती. मात्र आता शिल्पाची जागा शुभांगी अत्रेने घेतली असून तिचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.