71st National Film Awards Winners : भारतीय चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी १ ऑगस्टला करण्यात आली. या अंतर्गत मनोरंजन विश्वातील विविध श्रेणी व भाषांमध्ये असलेल्या सिनेमारुपी कलाकृतींचा गौरव करण्यात आला. मराठी सिनेमांना देखील यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये घवघवीत यश मिळालं आहे.

दिग्दर्शक सुजय डहाकेच्या ‘श्यामची आई’ या सिनेमाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे. साने गुरुजींच्या अजरामर साहित्यकृतीवर आधारित असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. ‘श्यामची आई’ हा सिनेमा लेखक-कवी आणि प्रसिद्ध समाजसुधारक साने गुरुजींच्या आत्मचरित्रावर आधारित आहे.

१९५३ मध्ये ‘श्यामची आई’ या सिनेमाची आचार्य अत्रेंनी निर्मिती केली होती, याच सिनेमाला पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. आता ७० वर्षांनी सुजय डहाकेच्या ‘श्यामची आई’ सिनेमाचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान होणार आहे.

याशिवाय ‘नाळ २’ सिनेमाचा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट म्हणून गौरव करण्यात येईल. यामध्ये भूमिका साकारणारी चिमुकली बालअभिनेत्री त्रिशा ठोसरला यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

तसेच आशीष बेंद्रेला ‘आत्मपॅम्फलेट’साठी ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – पदार्पण’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासह मराठमोळे मेकअप आर्टिस्ट श्रीकांत देसाई यांना देखील ‘सॅम बहादूर’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्टचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील अन्य महत्त्वाचे विजेते

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरुख खान ( जवान ) आणि विक्रांत मॅसी ( 12th Fail )
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राणी मुखर्जी ( मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे )
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सचिन लोवळेकर, दिव्या आणि निधी गंभीर ( सॅम बहादूर )
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – शिल्पा राव ( Chaliya, जवान )
  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – कथल: अ जॅकफ्रूट मिस्ट्री
  • सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – श्रीकांत देसाई (सॅम बहादूर)

दरम्यान, ‘श्यामची आई’ या सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये संदीप पाठक, गौरी देशपांडे, ओम भूतकर, शर्व गाडगीळ, सारंग साठ्ये, मयुर मोरे, ज्योची चांदेकर आणि सुनील अभ्यंकर या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.