बॉलीवूड अभिनेता सोहेल खानने अलीकडेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. बराच काळ मौन बाळगल्यानंतर आता तो पहिल्यांदाच त्याची एक्स पत्नी सीमा सजदेहपासून घटस्फोटाबद्दल उघडपणे बोलला आहे. सोहेल आणि सीमाचा लग्नाच्या २४ वर्षांनंतर घटस्फोट झाला. अखेर अभिनेत्याने एका मुलाखतीत त्यांच्या दूर होण्याचे कारण सांगितले आहे.
सोहेल खान व सीमा सजदेह एका फिल्मी वातावरणात भेटले आणि लवकरच दोघांनीही एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्यांनी कुटुंबाला प्राधान्य दिले आणि निर्वाण व योहान या दोन मुलांचे ते पालक बनले. हे नाते सुमारे २४ वर्षे टिकले; परंतु हळूहळू त्यांच्यात वाद होत गेले. सोहेल म्हणाला की, अनेक वेळा नात्यात प्रेम व आदर असूनही परिस्थिती साथ देत नाही आणि त्याच्याबरोबरही असेच घडले.
सीमा सजदेहबद्दल काय म्हणाला?
सोहेलने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटाबद्दल आपले मत मांडताना सीमाच्या गुणांचाही उल्लेख केला. तो म्हणाला की, सीमा केवळ एक चांगली व्यक्तीच नाही, तर ती एक उत्तम आईदेखील आहे. दोघांनीही परस्पर संमतीने निर्णय घेतला आहे की, मुलांच्या संगोपनात कोणतीही कमतरता येऊ देणार नाही. दरवर्षी आम्ही सगळे मिळून सुटीवर जाऊ, जेणेकरून मुलांना असे वाटेल की, पालक वेगळे झाले असूनही, त्यांच्या प्रेमात आणि काळजीत कोणताही बदल झालेला नाही.
सोहेल खानने स्पष्टपणे सांगितले की, पती-पत्नीमधील वादाचा मुलांवर सर्वांत जास्त परिणाम होतो. जेव्हा पालक सतत भांडतात तेव्हा त्याचा भार पुढच्या पिढीवर पडतो. त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो आणि ते अस्थिर होऊ शकतात. सोहेलच्या मते, मुलांच्या भविष्याचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून त्याने आणि सीमा यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
सीमा सजदेह ‘फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या रिअॅलिटी शोमध्ये घटस्फोटाबद्दल आधीच बोलली होती; तर सोहेलने आता आपले मौन सोडले आहे. या मुलाखतीनंतर हे स्पष्ट झाले आहे की, दोघेही पती-पत्नी म्हणून जरी वेगळे झाले असले तरी मुलांचे कल्याण आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी ते अजूनही एकत्र आहेत.
सोहेल आणि सीमा यांनी १९९८ मध्ये पळून जाऊन लग्न केले होते. लग्नानंतर २४ वर्षांनी सोहेल आणि सीमा यांचा संसार मोडला. सोहेलशी घटस्फोटानंतर सीमा विक्रम सिंगला डेट करीत आहे. विशेष म्हणजे सोहेलशी लग्न करण्यापूर्वी तिचा विक्रमबरोबर साखरपुडाही झाला होता.