बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. सोनालीने बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून चाहत्यांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला.
सोनाली बेंद्रे हिला स्टेज ४ कॅन्सर झाला होता, ज्याची तिला २०१८ मध्ये माहिती मिळाली. काही क्षणांसाठी ती हादरून गेली होती, पण नंतर पुन्हा उमेदीने उभी राहिली आणि सगळे औषधोपचार नेटाने पूर्ण करून आज त्या आजारातून ती पूर्णपणे बाहेरसुद्धा आली आहे. तिच्या संपूर्ण आजारपणाच्या काळात तिची जिद्द कायम होती, जशी आजही ती टिकून आहे.
सोनाली बेंद्रे तिच्या फिटनेससाठीदेखील चर्चेत आहे. तिला पाहून आज असे म्हणणे कठीण आहे की तिला स्टेज ४ कॅन्सर आहे. पण, जेव्हा डॉक्टरांना तिच्या कर्करोगाबद्दल कळले, तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले की इतकी फिटनेस फ्रिक असूनही तिला कॅन्सर कसा होऊ शकतो. एवढेच नाही तर सोनालीलाही खात्री नव्हती, तिला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं.
खरं तर सोनाली बेंद्रेने तिच्या कर्करोगाशी झालेल्या लढाईबद्दल सांगितले आहे. एएनआयशी झालेल्या संभाषणात तिने सांगितले की, जेव्हा तिला याबद्दल कळले तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि तिने त्याचा सामना कसा केला. या पॉडकास्टमध्ये सोनाली म्हणते, “मला विश्वास बसत नव्हता, मी रात्री उठायचे आणि मला वाटायचे की ते स्वप्न असावे. मला वाटायचं की ते एक स्वप्न आहे, जे दुसऱ्या दिवशी सकाळी खोटे ठरेल. मग सकाळी उठल्यावर मला कळलं की नाही, ते स्वप्न नाही तर वास्तव आहे. काहीही बदलणार नाही, म्हणून मी लवकरच हे सत्य स्वीकारलं.”
सोनाली म्हणते, “मी खूप व्यावहारिक व्यक्ती आहे आणि लवकरच सत्य स्वीकारण्याचा प्रयत्न करू लागले, त्यामुळे माझ्यासाठी ते हाताळण्याचा हा एक चांगला मार्ग होता.” सोनाली पुढे म्हणते, “मी बऱ्याच काळापासून यातून जात होते. त्याची लक्षणे आधीच दिसू लागली होती, पण ती कधीच आढळली नाही.’ अभिनेत्री म्हणते, “२०१८ मध्ये डॉक्टर म्हणायचे की जर तुमचे आयुष्य निरोगी असेल तर ते तुमच्याबरोबर कसे होऊ शकते, पण आज २०२५ आहे. आज याबद्दल उघडपणे बोलता येते. ते अनुवांशिक असू शकते. अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे ते कोणालाही होऊ शकते.” सोनाली बेंद्रे म्हणाली की, या संपूर्ण कठीण काळात तिचे कुटुंब तिच्याबरोबर उभे राहिले. तिचा पती आणि कुटुंबातील इतर सदस्य नेहमीच तिच्याबरोबर राहिले.
सलमान खानने कठीण काळात साथ दिली : सोनाली बेंद्रे
सोनाली बेंद्रेने पुढे सांगितले की, त्या कठीण काळात सलमान खान तिच्या पाठीशी कसा उभा राहिला. त्याच मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, सलमानचीही एक दयाळू बाजू आहे. तो तिच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान न्यूयॉर्कमध्ये तिला दोनदा भेटायला गेला होता. तो डॉक्टरांकडून तिच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती घेत असे. त्याच वेळी तो त्याच्या बाजूच्या डॉक्टरांना सूचनादेखील देत असे. सोनालीने सांगितले की, जेव्हा सलमानला कळले की ती आता बरी होत आहे आणि तिची प्रकृती सुधारत आहे, तेव्हा त्याला दिलासा मिळाला. सलमानने त्यावेळी सोनालीच्या कुटुंबातील एका ज्येष्ठ सदस्याची भूमिका साकारली होती.
सलमान खान आणि सोनाली बेंद्रे यांनी ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या संभाषणात ती असेही सांगते की, या चित्रपटापूर्वी ते एकमेकांना ओळखत नव्हते.