Sonam Kapoor and Anand Ahuja Expecting Second Child : बॉलीवूडची स्टायलिश अभिनेत्री व अनिल कपूरची लाडकी लेक सोनम कपूरच्या घरात पुन्हा एकदा लहानग्या पाहुण्याची चाहूल लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोनम दुसऱ्यांदा आई होणार आहे. लवकरच सोनम आणि पती आनंद आहुजा ही गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर करणार आहेत.

पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, सोनम सध्या तिच्या गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत आहे. एका सूत्राने या वृत्ताला दुजोरा देत म्हटले आहे, “सोनम पुन्हा एकदा आनंदाची बातमी सांगणार आहे आणि या बातमीने दोन्ही कुटुंबांना आनंद झाला आहे.” सोनमच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सोनम किंवा तिच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही; पण चाहते आतापासूनच तिच्या सोशल मीडिया पोस्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर मे २०१८ मध्ये लग्न केले. या जोडप्याने ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांचा पहिला मुलगा वायू याचे स्वागत केले. तेव्हापासून सोनमने तिचा आई होण्याचा प्रवास आणि तिच्या मुलाबरोबरचे गोड क्षण सोशल मीडियावर वारंवार शेअर केले आहेत. वायू आता तीन वर्षांचा झाला आहे.

सोनम तिचा बहुतेक वेळ लंडनमध्ये घालवते. तिचे सासरचे लोक दिल्लीत राहतात आणि मुंबईतही त्यांचे घर आहे. ती चित्रपटांमध्ये काम करीत नसली तरी जाहिराती आणि मॉडेलिंगच्या कामांसाठी ती मुंबईत येते. ती तिचे काम आणि वैयक्तिक आयुष्य यांबद्दल इन्स्टाग्रामवर वारंवार पोस्ट करते.

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सांवरिया’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘रांझणा’, ‘दिल्ली-6’, ‘आयेशा’, ‘खूबसूरत’, ‘वीरे दी वेडिंग’ व ‘नीरजा’ यांसारखे हिट चित्रपट दिले.

२०२३ मध्ये सोनम ‘ब्लाइंड’मध्ये दिसली, जो एका कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. आता ती अनुजा चौहान यांच्या कादंबरीवर आधारित ‘बॅटल फॉर बिटोरा’ या चित्रपटात दिसणार आहे.