युट्यूब व्हिडीओ आणि नंतर अभिनयाची आवड म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणारा युट्यूबर आणि अभिनेता सुमित चव्हाण सोशल मीडियावर बराच लोकप्रिय आहे. व्हिडीओ अल्बमच्या माध्यमातून अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या सुमितच्या वडिलांचं अलिकडेच निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर सुमितनं त्यांच्यासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. सुमितची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

वडिलांच्या निधनानंतर त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करताना सुमितनं लिहिलं, “बाप माणुस गेला.. दुःखापासून खूप लांब, आनंदात लपून बसलो होतो, अचानक दुःख येतं आणि तुम्हाला धप्पा देतं, तुम्ही आउट होता. २००१ मध्ये बाबांची मिल बंद झाली, मुलाचं शिक्षण मुंबईतच झालं पाहिजे, म्हणून ते मुंबईत थांबले, रिक्षा चालवून आमचं शिक्षण पूर्ण केलं. शाळा, कॉलेज आणि परवा पर्यंत शूटसाठी मला त्याच रिक्षातून सोडत होते, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करत होतो, पण काही स्वप्न राहून गेली, गेले २१ वर्ष रिक्षा चालवली, आपल्या स्वतःच्या कार मध्ये बसून फिरवायच होतं, गावाला मोठा बंगला बांधायचा होता, बहिणीचं लग्न करून दयायचं होतं, मला मोठया पडदयावर बघायचं होत. पण मी हे सगळं नाही करू शकलो पूर्ण, मला उशीर झाला, आयुष्यभर ह्या गोष्टी मनाला टोचत राहतील.”

सुमित पुढे लिहितो, “काय पण साला नशीब आहे, ज्या दिवशी मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली, त्याच दिवशी बाबांनी एक्झिट घेतली, एवढी वर्ष रिक्षा चालवली, आणि रिक्षातच आईच्या कुशीत जीव सोडला. बाबा तुम्ही आता स्टार झालात, वरून बघत रहा, मी सगळी स्वप्न पूर्ण करेन, काळजी नका करू. ते कट्टर शिवसैनिक होते, त्यांना आपल्या आजूबाजूला गर्दी करायला आवडत होती, रात्री अचानक गेले तरी त्याच्यासाठी गर्दी झाली, ही त्यांनी कमावलेली माणसं होती. मी खूप प्रेम करतो तुमच्यावर.. हे एकदा तुम्हाला बोलायचं होतं, बाबा आपण पुन्हा भेटू, गप्पा मारू, तो पर्यंत आईची बहिणीची मी काळजी घेईन, राहिलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची ताकद मला माझ्या जवळच्या मित्रांनी दिलीय. तुम्ही खूप धावपळ केली आता आराम करा.”

आणखी वाचा- सुष्मिता सेनच्या भावाचे पत्नीवर गंभीर आरोप, समोर आलं घटस्फोटाचं धक्कादायक कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुमित चव्हाणने प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतो. त्याच्यासोबत भाग्या नायर देखील अभिनय साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते या दोघांचे व्हिडीओ अनेकदा व्हायरलही होत असतात. फेक रे न्यूज, ही चाळ तुरु तुरु, छोटी खोटी लव्ह स्टोरी अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुमित चव्हाणने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर त्याचा बराच मोठा चाहता वर्ग आहे.