बॉलीवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा अनेकदा चर्चेत असतात. सुनीता त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखल्या जातात.

अनेकदा त्या गोविंदासह कार्यक्रमांना उपस्थित असतात. सुनीता यांनी अनेक मुलाखतींमधून गोविंदा, तसेच बॉलीवूडबद्दल स्पष्ट वक्तव्ये केली आहेत. अशातच आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्या त्यांच्या आईबद्दल बोलल्या आहेत.

गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा शाळेत असतानाच प्रेमात पडले होते. सुनीता यांच्या पालकांना सुरुवातीला हे नाते मान्य नव्हते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुनीता आठवीत नापास झाल्यावर त्यांच्या आईने त्यांना मारले होते आणि त्या घरी याबद्दल खोटं बोलल्या होत्या याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. त्या हुशार विद्यार्थिनी नव्हत्या पण त्यांच्या आईला त्यांना अभ्यासात उत्कृष्ट बनवायचे होते. असं देखील त्या म्हणाल्या.

गलाट्टा इंडियाशी बोलताना सुनीता म्हणाल्या, “मी आठवीत होते आणि मी नापास झाले होते. मी माझ्या आईला याबद्दल सांगितले नव्हते आणि तेव्हा मी गोविंदाबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. मी माझ्या आईला खोटे बोलले की मी उत्तीर्ण झाले आहे. म्हणून माझ्या आईने तवा गरम केला आणि तिने मला चटका दिला, आणि तिने मला खोटे बोलल्याबद्दल प्रश्न विचारला. माझी आई खूप कडक होती. ती मला अभ्यास करायला भाग पाडत होती पण मला ते आवडत नव्हते. मी जेव्हा जेव्हा माझी पुस्तके उघडायचे तेव्हा मी झोपी जायचे.”

सुनीता यांनी त्यांच्या बालपणातील आणखी एक किस्सा सांगितला जिथे त्यांनी त्यांच्या मोठ्या बहिणीला त्रास दिला होता. “माझी मोठी बहीण, एकदा ती मला अभ्यास करायला लावण्याचा प्रयत्न करत होती आणि मला ते आवडत नव्हते. म्हणून मी ब्लेड घेतले आणि तिच्या मांडीला मारले,” असं त्या म्हणाल्या. सुनीता म्हणाल्या की त्यांना इतर विषय आवडत नसले तरी गणितात मला रस होता. कारण मला पहिल्यापासून पैसे मिळवणे आवडते.

गोविंदा व सुनीता आहुजा यांनी ११ मार्च १९८७ रोजी लग्न केलं. या दोघांना टीना आहुजा, व यशवर्धन आहुजा, अशी दोन मुलं आहेत. गोविंदा व त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. सुनीता १५ वर्षांच्या होत्या तेव्हा गोविंदाच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी गोविंदाशी लग्न केलं. लग्नात सुनीता १८ वर्षांच्या तर गोविंदा २४ वर्षांचा होता.