सुशांत आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्ती मुंबईच्या घरातून झाली गायब

रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rhea Chakraborty
रिया चक्रवर्ती

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याची कथित प्रेयसी व अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी पाटणा पोलिसांची चार जणांची टीम मुंबईला आली. मात्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस जेव्हा रियाच्या घरी पोहोचले तेव्हा ती घरातून गायब असल्याचं निदर्शनास आलं. अटकपूर्व जामिनासाठी रियाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचंही म्हटलं जात आहे.

जामीन मिळवण्यासाठी रियानं अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांची केस लढणाऱ्या भारतील प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेल्या मानशिंदे यांना नेमलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल दीड महिन्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरूद्ध फिर्याद दाखल केली. पाटण्यातील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, बिहार पोलीस सध्या मुंबईत तपासासाठी दाखल झाले आहेत. रियावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याबरोबरच इतरही गंभीर आरोप सुशांतच्या वडिलांनी केले आहेत.

रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी यापूर्वी अभिनेता सलमान खान व संजय दत्त या दोघांच्या केस लढल्या आहेत. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान व १९९३मधील बॉम्बस्फोट प्रकरणात अडकलेल्या अभिनेता संजय दत्तची बाजू मांडणारे वकील मानशिंदे अभिनेत्री रिया चक्रवर्तीची केस लढणार आहेत. मानशिंदे यांनी रियाच्या अटकपूर्व जामीनाचे कागदपत्र तयार केले असून, मंगळवारी रात्री त्यांच्या सहाय्यक वकील आनंदिनी फर्नांडिस या रियाच्या घराबाहेर दिसल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sushant singh rajput death case rhea chakraborty is missing from her mumbai residence ssv