Tabu spoke Marathi in Filmfare Awards Marathi 2025 : सर्वात प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर मराठी २०२५’ पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला.
मुंबईत झालेल्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मराठी कलाकारांबरोबरच बॉलीवूड कलाकारांनीदेखील या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये धमाल केली.
अनेक बॉलीवूड कलाकारांनी या मराठी फिल्मफेअर पुरस्काराला उपस्थिती लावली होती. नवाजउद्दीन सिद्दिकी, तब्बू, राजकुमार रावसह अनेक बॉलीवूड कलाकार मराठी फिल्म फेअर अवॉर्डच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. तब्बू तिच्या देसी लूकमध्ये दिसली, तर राजकुमार राव त्याच्या नवीन लूकमध्ये खूपच हँडसम दिसत होता. जयदीप अहलावतने त्याच्या स्टाईलने लोकांचे लक्ष वेधले.
संपूर्ण सोहळ्यामध्ये तब्बूने खास लक्ष वेधलं. या कार्यक्रमात अभिनेत्री तब्बू मराठी भाषेत बोलताना दिसली. तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे तिने आभार मानत असताना त्यांना मिठीदेखील मारली. फिल्मफेअरने तब्बूचा हा व्हिडीओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.
तब्बू काय म्हणाली?
“नमस्कार.., मी खूप खूश आहे. तुम्ही मला सन्मान दिलात, यासाठी खूप खूप आभार.. हे अवॉर्ड मी अशा दिग्दर्शकाला देत आहे, ज्याने मला माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा सिनेमा आणि भूमिका दिली..”, असं त्यावेळी तब्बू म्हणाली. यावेळी महेश मांजरेकर यांचे नाव तिने जोराने पुकारलेलं पाहायला मिळालं. यानंतर तब्बूने महेश मांजरेकर स्टेजवर आल्यानंतर त्यांना मिठीदेखील मारली. मराठी भाषेत व्यक्त झाल्याने नेटकऱ्यांनी तब्बूचे कौतुक केले आहे.
महेश मांजरेकर काय म्हणाले?
”महेश मांजरेकर म्हणाले, पुरस्कार मिळाल्याचा तर आनंद आहेच, पण माझी मैत्रीण तब्बूच्या हातून पुरस्कार मिळाल्याने तो अधिक खास झाला आहे. माझ्या मते, तब्बू जगातील सर्वोत्तम अभिनेत्री आहे. आजही जेव्हा मी ‘अस्तित्व’ हा चित्रपट पाहतो, तेव्हा तब्बूने त्या चित्रपटात जे काम केले आहे, ते पाहून मी थक्क होतो.”
तब्बूच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ती सध्या अक्षय कुमारबरोबर एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘भूत बंगला’ चित्रपटात तब्बू दिसणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात परेश रावलदेखील दिसणार आहेत.