एकेकाळची सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा मुखर्जीची मुलगी आणि सुपरस्टार काजोलची बहिण तनीषा मुखर्जीने नेपोटिझमवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. गेल्या काही दिवसांपासून नेपोटिझमवर सुरू असलेला वाद हा निरर्थक असल्याचं तिनं म्हटलंय. तसंच “नेपोटिझमवर बोलण्याआधी एकदा माझ्याकडे पहा, मी स्वतः एक नेपोटिझम नावाचं फेलिंग पोस्टर आहे”, असं देखील तिने म्हटलंय.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. “आजच्या काळात जर तुम्ही मेहनत घेतली नाही तर तुम्ही कुठेच दिसणार नाहीत. एक व्यक्ती जो स्टार किड नसतो आणि तो इंडस्ट्रीत स्वतःचं नाव कमावतो…ब्रेक मिळण्यापूर्वी त्याला किती मेहनत घ्यावी लागते, हे तो सांगताना दिसून येतो…पण त्यांना स्टार किड्सप्रमाणे लोकांचा पूर्वानुमान तर सहन करावा लागत नाही…ज्याप्रमाणे धर्मेद्र यांच्या मुलांनी त्यांच्यासारखंच असलं पाहिजे किंवा मग तनुजा यांची मुलगी त्यांच्यासारखीच असली पाहिजे अशा विचारांचा त्यांना सामना करावा लागत नाही.”, असं यावेळी तनिषा मुखर्जी म्हणाली.

यापुढे बोलताना तनिषा म्हणाली, “नेपोटिझमचं सगळ्यात मोठं उदाहरण तर मीच स्वतः आहे. माझ्या एका बाजुला राणी मुखर्जी तर दुसऱ्या बाजूला अजय देवगण आहे…समोर आई तनुजा मुखर्जी आणि बहिण काजोल हे सगळे आहेत. मी तर नेपोटिझमचं फेलिंग पोस्टर आहे. जे कोणी या वादावर बोलत आहेत एकदा त्यांनी माझ्याकडं पहावं आणि मग बोलावं.” यापुढे बोलताना तनिषा मुखर्जी हिने सुरवातीचे काही दिवस आठवत म्हणाली, “जेव्हा मी या इंडस्ट्रीत आली होती त्यावेळी मी काजोल सारखीच असावी, अशी लोकांनी माझ्याकडे अपेक्षा केली होती. पण तिचे डोळे वेगळे आहेत. ती माझ्यापेक्षा उंच आहे…कर्ली केस आहेत…ती कोणत्याच दृष्टीकोणाने माझ्यासारखी नाही.”

स्टार किड असूनही ठरली फ्लॉप

तनिषा मुखर्जी ही केवळ एक स्टार किड नव्हे तर तिच्या कुटुंबातून अनेक जणांनी बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावलंय. तिची आई तनुजा मुखर्जी यांच्यासोबतच बहिण काजोल आणि चुलत बहिण राणी मुखर्जी या गाजलेल्या अभिनेत्री आहेत. तिच्या बहिणीचा पती अजय देवगण हा सुद्धा एक सुपरस्टार आहे. पण तनिषाचं करिअर मात्र फ्लॉप ठरलं. ‘शश्श्शश्श..’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाऱ्या तनिषा मुखर्जीला पुढे जाऊन काही चित्रपट मिळाले. पण तरी सुद्धा तिला यात यश मिळालं नाही.