‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेता अभिषेक देशमुख घराघरांत लोकप्रिय झाला. वैयक्तिक आयुष्यात अभिषेकने कृतिका देवशी लग्न केलं आहे. ६ जानेवारी २०१८ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र, या दोघांच्या लग्नाची मूळ तारीख काहीतरी वेगळीच होती. अचानक लग्नाची तारीख बदलण्यासाठी कारणीभूत ठरली होती माधुरी दीक्षित. अभिषेक-कृतिकाच्या लग्नाचा भन्नाट किस्सा जाणून घेऊयात…
अभिषेक देशमुख ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगताना म्हणाला, “आमच्या लग्नाच्या वेळी एक भन्नाट किस्सा घडला होता. आमच्या लग्नाची तारीख ठरली होती १२ जानेवारी. त्यावेळी आम्हा दोघांचा मनोरंजन विश्वातला प्रवास सुद्धा सुरू होता. आम्हाला मिळेल ते काम आम्ही करत होतो. चित्रपटसृष्टीत तुम्हाला प्रत्येकवेळी काम मिळेल असं नाही. त्यामुळे प्रत्येक काम आपलं मानून करायचं, हे आमचं आधीच ठरलं होतं.”
अभिषेक पुढे म्हणाला, “लग्नाची तारीख ठरली आणि कृतिकाला ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाची ऑफर आली. त्यात माधुरी दीक्षित, सुमीत राघवन असे सगळे मोठे कलाकार होते. आमच्या लग्नाची तारीख होती १२ जानेवारी आणि तिच्या चित्रपटाच्या शूटिंगचं शेड्यूल सुद्धा नेमकं तेव्हाच लागलं. आम्ही हॉल वगैरे सगळं काही ठरवलं होतं. सर्वांना आमंत्रण दिलं होतं, आमचे मित्र-मैत्रिणी आदल्यादिवशी लग्नाला येणार होते…अगदी सगळं काही ठरलं होतं. त्यानंतर मला अचानक कृतिकाचा फोन आला. तिला ९ जानेवारीपासून चित्रपटाच्या सेटवर उपस्थित राहायचं होतं. त्यामुळे आता काय करायचं असा प्रश्न आम्हा सगळ्यांसमोर निर्माण झाला. लग्न आहे त्या तारखेला करायचं असेल, तर चित्रपट सोडावा लागेल हे तिला माहिती होतं. मग तिने घाबरत मला फोन केला. मी अजिबात चिडलो वगैरे नाही, मलाही दडपण आलं होतं. मग आम्ही आईशी बोललो.”
कृतिका देव याविषयी म्हणते, “सिनिअर कलाकारांच्या तारखा मॅच झाल्यामुळे त्याच दिवशी शूट फायनल करण्यात आलं होतं. त्यात त्यादिवशी एका गाण्याचं शूट होतं, त्यामुळे काहीच पर्याय नव्हता. माझ्या एकटीकरता ते काही बदलणार नव्हतं. अभिषेकच्या आईला फोन केल्यावर त्या सहज बोलल्या ठिके मग आपण तारीख बदलूया. लग्नाची तारीख बदलता येईल हे माझ्या डोक्यातही नव्हतं. पण, काकूंनी ते अगदी सहज सावरून घेतलं. लग्नाची तारीख आम्ही बदलली आणि आधी लग्न करायचं ठरलं. आमचं लग्न ६ तारखेला झाला”
“आम्ही लग्नाची तारीख बदलली हे जेव्हा माधुरी दीक्षित यांना समजलं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं होतं. मुळात मी लग्न करतेय यामुळेच त्या सरप्राइज झाल्या होत्या त्यात मी चित्रपटासाठी लग्नाची तारीख बदलली हे ऐकून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं होतं.” असं कृतिकाने सांगितलं.