मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही त्यांच्या साधेपणसाठी ओळखली जातात. कलाकार किंवा सेलिब्रिटी असल्याचा आव न आणता अगदी सामान्य माणसाप्रमाणे हे कलाकार वागतात. कलाकारांचा हाच साधेपणा चाहत्यांना भावतो. अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक अपडेट्स शेअर करत असतात, ज्यातून त्यांचे साधेपणा दिसून येतो. अशीच आपलं साधेपण जपणारी अभिनेत्री म्हणजे आश्विनी महांगडे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. याशिवाय तिच्या आयुष्यातल्या अनेक अपडेट्सही देत असते. अशातच तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अश्विनीने शेअर केलेल्या या व्हिडीओ मध्ये ती शेतीकाम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शेतीकाम करतानाचा व्हिडीओ शेअर करत अश्विनीने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीखालील कॅप्शनमध्ये अश्विनी म्हणते, “शेती हा एक संस्कार आहे, पुढच्या पिढीला तो देणे गरजेचे आहे. आज मुलांच्या हातात मोबाईल आहे पण वेळ आली तर स्वतःच्या पोटासाठी पिकवताही यायला हवे. मनगटात ताकद हवी आणि पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे राहता यायला हवे.”

यापुढे तिने असं म्हटलं, “दुसऱ्यांना देण्याची दानत ही शेतकऱ्यांकडेच असते आणि हा गुण आपल्या मुलांनी घ्यायला हवा. आज रवी आणि वहिनींनी यासाठी मुलांना आमच्याकडे आणले. वेद आणि आर्या तर गुणी आहेतच, त्यांनी आनंदाने इवल्यश्या डोळ्यात सगळे साठवून घेतलं.” अश्विनीने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

तसेच अभिनेत्रीच्या या साधेपणाचं कौतुकही केलं आहे. या व्हिडीओ खाली चाहत्यांनी “खरंच तुमचा खूप अभिमान आहे, “अभिनेत्री असूनही मदत म्हणून शेतात काम करतेस हेच तुझं मोठेपण आहे,” “हे जपलं पाहिजे”, “खूप छान,” “म्हणूनच तुम्ही अभिनेत्री म्हणून आम्हाला आवडता”, “उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच उत्तम माणूस कसं असावं हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे” अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अश्विनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत काम केलं आहे. तसंच ‘अस्मिता’ मालिकेतही ती पाहायला मिळाली होती. ‘आई कुठे काय करते’मुळे तिला आणखी लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातही होती. नुकताच तिचा ‘धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे.