Kaumudi Walokar Celebrates Diwali With Husband : मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार यंदा लग्नानंतरची त्यांची पहिली दिवाळी साजरी करीत आहेत. अभिनेता अक्षय केळकर, शाल्व किंजवडेकर, रेश्मा शिंदे यांसारखे काही कलाकार यंदा लग्नानंतर त्यांच्या जोडीदारांबरोबर पहिल्यांदाच दिवाळी साजरी करीत आहेत. अशातच कौमुदी वलोकरनेही लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीचा फोटो शेअर केला आहे.

‘आई कुठे काय करते’ मालिकेत आरोहीची भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कौमुदी वलोकर यंदा लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करीत आहे. कौमुदीने आकाश चौकसेबरोबर डिसेंबर २०२४ मध्ये लग्न केलं. त्यामुळे यंदाची दिवाळी ही लग्नानंतरची तिची पहिलीच दिवाळी असून, तिनं नवऱ्याबरोबर दिवाळी साजरी केल्याचं शेअर केलेल्या फोटोमधून दिसतं.

कौमुदी वलोकरने साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी

कौमुदी वलोकर सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामार्फत ती तिचे अनेक फोटो, कामाच्या अपडेट शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. कौमुदीचा नवरा कामानिमित्त परदेशात असतो. त्यामुळे लग्नानंतरही ते दोघे लॉंग डिस्टन्समध्ये राहत आहेत. अशातच आता दिवाळीनिमित्त दोघे एकत्र आले असून, यावेळी तिने नवऱ्याबरोबर दिवाळी साजरी करीत असतानाचा फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये दोघे एकत्र दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. या फोटोवर तिनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असंही लिहिलं आहे. यामध्ये ते त्यांच्या घराच्या बालकनीत असून तिथे दिव्यांची सजावट केलेली दिसते. दोघांनीही अगदी साध्या पद्धतीने दिवाली साजरी केली आहे.

कौमुदी अनेकदा सोशल मीडियावर तिच्या नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करीत असते. त्यासह ती तिच्या कुटुंबीयांचे व मित्र-मैत्रिणींबरोबरचेही फोटो पोस्ट करताना दिसते. कौमुदीने डिसेंबरमध्ये थाटामाटात मराठमोळ्या पद्धतीनं आकाशबरोबर लग्न केलं. त्यावेळी त्यांच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार उपस्थित होते. लग्नातील तिच्या लूकमुळे साऱ्याचं लक्ष वेधलं गेलं होतं.

दरम्यान, कौमुदी वलोकर मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं अनेक मालिका, नाटकांमध्ये आणि चित्रपटांतही काम केलं आहे. विविध माध्यमांवर काम करीत तिनं तिच्या सहजसुंदर अभिनयानं अनेकांची पसंती मिळवली आहे.