Aai Kuthe Kay Karte Fame Actress : स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरी अजूनही या मालिकेची आणि मालिकेतील कलाकारांची क्रेझ काही कमी झालेली नाही. मालिकेतील अनिरुद्ध, अरूंधती, संजना, यश, अभिषेक, ईशा, कांचन आजी आणि आजोबा यांसह सर्वच कलाकारांनी लक्ष वेधलं होतं. या मालिकेत काही दिवसांनी यशची बायको आरोही या नव्या पात्राची एन्ट्री झाली.
मराठी अभिनेत्री कौमुदी वलोकरने मालिकेत आरोही ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनंतर कौमुदी कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. पण ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर कौमुदी तिचे अनेक फोटो शेअर करत असते. अशातच तिने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
कौमुदीने सोशल मीडिया आत्महत्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती असं म्हणते, “आत्महत्या… एकटं वाटणं.. आत्महत्येचा विचार मनात येणं ही कोणाची चूक नसते.. हा प्रश्न ‘का येतो?’ असा नसून, ‘कसा समजून घ्यायचा?’ असा असावा. कारण हे विचार जेव्हा येतात, तेव्हा माणूस तुटलेला नसतो, तर खूप प्रयत्न करून थकलेला असतो. आपले मित्र, मैत्रिणी, आपलं कुटुंब ही आपली पहिली मदतीची वर्तुळं असतात.”
कौमुदी वलोकर इन्स्टाग्राम पोस्ट
यानंतर तिने असं म्हटलं आहे, “बोलणं, मन मोकळं करणं. याने मोठा फरक पडतो. पण कधी कधी हे शक्य होत नाही. कारण त्यामागे असतो गोंधळ, भिती, अपराधीपणाची भावना. त्यावेळी, व्यावसायिक मदतीकडे वळणं ही कमजोरी नसून एक हिंमत असते. मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक किंवा आपल्यासमोर असलेली व्यक्ती… त्यांच्या मदतीचा विचार करायला हवा.”
यानंतर कौमुदीने म्हटलं, “हे विचार येणं स्वाभाविक आहे. त्यांना दाबणं नव्हे, तर समजून घेणं, ‘असं का वाटतंय?’ याचा शोध घेणं, हीच पुढे वाट मिळवण्याची सुरुवात आहे. माणूस हरवलेला असतो, पण पूर्ण संपलेला नसतो. थांबूया, समजून घेऊया आणि गरज असेल तर मदतीचा हात मागूया. कृपया मदत मागा. बऱ्याचदा कोण किती आणि कसा संघर्ष करत आहे हे आपल्याला माहीत नसतं.”
यानंतर ती असं म्हणते, “प्रत्येकजण वेगळा असतो. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो आणि यातून बाहेर येण्याची पद्धतही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांशी चांगलं वागलं पाहिजे आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” दरम्यान, कौमुदीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.