सुव्रत जोशी हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी अभिनेता म्हणून ओळखलं जातो. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचा हजरजबाबीपणा आणि त्याचा उत्स्फूर्तपणा हा सर्वांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्या फोटोंवर त्याने लिहिलेल्या हटके किंवा मोठ्या कॅप्शन्स अनेकदा लक्ष वेधून घेत असतात. तर आता तो त्याच्या पोस्ट्सना इतक्या लांबलचक कॅप्शन्स का देतो हे त्याने सांगितलं आहे.
सुव्रतने नुकतीच ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला हजेरी लावली होती. तर याच पुरस्कार सोहळ्यात अंकिता वालावलकर या लोकप्रिय कंटेंट क्रिएटरशी मजेशीर संवाद साधला. यावेळी तिने गमतीत तो इंस्टाग्राम पोस्टवर लिहित असणाऱ्या लांब कॅप्शन्समागील कारण त्याला विचारलं. त्यावर सुव्रतनेही त्याच्या शैलीत मजेशीर उत्तर दिलं.
तो म्हणाला, “इंस्टाग्रामवरील माझ्या पोस्ट्सना मी मोठाल्या कॅप्शन्स लिहितो हे खरं आहे. याचं कारण असं की मला घरात बोलू दिलं जात नाही जास्त. त्यामुळे मला इंस्टाग्रामवर टाईप करावं लागतं. जेव्हा जेव्हा माझा आवाज दाबला गेला आहे तेव्हा तेव्हा मी इंस्टाग्राम वरून व्यक्त झालो आहे. त्यामुळे माझा आवाज दाबू नका आणि माझे आई-वडील कोकणी आहेत. कोकणी माणसाचा आवाज दाबू नका.”
हेही वाचा : “मला निवडल्याबद्दल…” सखी गोखलेने मानले पती सुव्रत जोशीचे आभार
आता त्यांचा हा गमतीशीर व्हिडीओ खूप चर्चेत आला असून यावर सुव्रतचे चाहते प्रतिक्रिया देत त्याचा हा मिश्किल अंदाज आवडला असल्याचं त्याला सांगत आहेत.