Pooja Birari & Soham Bandekar : ‘स्वाभिमान’, ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकांमधून अभिनेत्री पूजा बिरारी घराघरांत लोकप्रिय झाली. गेल्या काही दिवसांपासून पूजा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सोशल मीडियावर पूजा बिरारी बांदेकरांची सून होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याशिवाय आदेश बांदेकर यांच्या घरगुती बाप्पाच्या महाआरतीला सुद्धा अभिनेत्री उपस्थित होती. यामुळेच पूजा आणि सोहमच्या लग्नाच्या चर्चांनी सर्वत्र आणखी जोर धरला.

सोहम किंवा पूजा या दोघांनीही याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत पूजाला सोहमविषयी अप्रत्यक्षरित्या प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अभिनेत्री उत्तर देताना लाजली आणि इतक्यात तरी मी यावर काहीच बोलणार नाहीये असं तिने सांगितलं. मात्र, जेव्हा ही बातमी पहिल्यांदा सर्वत्र प्रसारित झाली तेव्हा नेमकं काय घडलं होतं हा किस्सा पूजाने यावेळी सांगितला.

“मालिकेत राया जरा हिंसक आहे पण, तुझा खऱ्या आयुष्यातील जोडीदार तेवढाच शांत आहे. यावर तू काय बोलशील?” हा प्रश्न ऐकताच पूजा बिरारी लाजली…तिच्या चेहऱ्यावर हसु उमटलं अन् ती लाजत-लाजत म्हणाली, “मला इतक्यात तरी यावर काहीच बोलायचं नाहीये.”

“जेव्हा ती बातमी सर्वांपर्यंत पोहोचली तेव्हा पूजा तुला खूप फोन कॉल आले असतील ना?” यावर पूजा म्हणते, “मला आता काय बोलू आणि काय नको असं होतंय…बरं ठिके. मी सेटवर छान झोपले होते. एकतर मी सेटवर कधीच झोपत नाही. पण, त्यावेळी आमचं शूटिंग डे-नाईट असं खूप वेळ सुरू होतं. त्यात थोडा ब्रेक मिळाल्यावर मी झोपले. मी झोपून उठल्यावर फोन पाहिला तेव्हा असे भरमसाठ मिसकॉल माझ्या फोनवर आले होते. पण, ठिके…यापेक्षा जास्त आता मी काहीच सांगणार नाही.”

दरम्यान, सोहम बांदेकरबद्दल सांगायचं झालं, तर हा आदेश व सुचित्रा बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा आहे. सोहम सध्या ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन मालिकांचा निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. यापूर्वी सोहम ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत सुद्धा झळकला होता.