Bollywood Actress Talk’s About Casting couch : कास्टिंग काऊच आणि बॉलीवूड हा मुद्दा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. अनेक कलाकारांनी याबाबत त्यांचे अनुभव बऱ्याचदा सांगितले आहेत. अभिनेत्रींसह अभिनेत्यांनाही काहीवेळा याला सामोर जावं लागल्याचं मुलाखतींमधून त्यांनी सांगितल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीने तिचा याबाबतचा अनुभव सांगितला आहे.
लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीला एकदा कास्टिंग काऊचचा अनुभव आल्याचं तिने म्हटलं आहे. ‘मंडला मर्डर्स’ या आगामी वेब सीरिजमधून झळकणारी अभिनेत्री सुरवीन चावला हिने याबाबत सांगितलं आहे. तिने सिद्धार्थ कन्नला मुलाखत दिली. यामध्ये ती म्हणाली, “अशी एकवेळ होती, जेव्हा सगळीकडे कास्टिंग काऊचसारख्या गोष्टी घडायच्या. माझं असं व्हायचं की मला हे करायचं नाहीये. त्यावेळी बॉलीवूडमध्ये कास्टिंग काऊच ट्रेंडिंग होतं.”
सुरवीन चावला पुढे म्हणाली, यामुळे तिला अनेक भूमिका गमवाव्या लागल्या. अभिनेत्री म्हणाली, “प्रत्येकवेळी मी या कुठल्याही गोष्टीला पाठिंबा देत नसल्याने मला भूमिका गमवाव्या लागायच्या. पण, हे खूप भयानक होतं, मला खूप त्रास झाला. मला असं वाटायचं की यासाठी मी इथे आले नाहीये.”
सुरवीनने पूर्वी ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत तिचा अनुभव सांगितला होता. ती म्हणालेली, “मुंबईतील वीरा देसाई रोडला एका ठिकाणी मी मिटिंगसाठी गेले होते. तिथं त्यांचं मोठं ऑफिस होतं. माझं लग्न झाल्यानंतरची गोष्ट आहे ही.”
अभिनेत्रीने पुढे सांगितलं, “महत्त्वाचं म्हणजे मिटिंगमध्ये बोलताना माझं लग्न झालं आहे, याबाबत त्यांना माहिती होती. त्यांनी मला माझ्या नवऱ्याविषयी विचारलही होतं. त्यांचं केबिन खूप मोठं होतं. बोलणं झाल्यानंतर जेव्हा मी निघाले तेव्हा दरवाज्याजवळ असताना ते आले आणि त्यांनी मला किस करण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले, काय करताय तुम्ही आणि तिथून निघाले.”
दरम्यान, सुरवीन चावलाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच ती ‘मंडला मर्डर्स’मधून झळकणार आहे. ही सीरिज २५ जुलैला ‘नेटफ्लिक्सवर’ प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी तिने ‘वेलकम बॅक’, ‘हिरो’, ‘हेट स्टोरी २’, ‘अगली’, ‘हिम्मतवाला’, ‘हम तुम शबाना’ यांसारख्या चित्रपटांतून काम केलं आहे. तिने टेलिव्हिजनपासून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. सुरवीनने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. यानंतर तिने ‘हद से’, ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्येही काम केलं. अभिनेत्रीने पंजाबी, तामिळ व हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.