अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही अभिनय क्षेत्रापासून लांब जात लोकप्रिय यूट्यूबर म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. ती तिच्या युट्युब चॅनलवरून आणि सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच तिने तिच्या यूट्यूब चॅनलच्या १ मिलियन सबस्क्राईबर्सचा टप्पा पार केला. त्यानिमित्ताने खास व्हिडिओ बनवत तिचा आजवरचा संपूर्ण प्रवास चाहत्यांची शेअर केला.
उर्मिला निंबाळकर यांनी नुकताच तिचा एक व्हिडिओ तिच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला. यावेळी मनोरंजन सृष्टीत तिला आलेले अनेक चांगले, वाईट अनुभव तिने शेअर केले. एका लोकप्रिय मालिकेतून तिला अचानक काढून टाकल्याचा खुलासाही तिने केला. याचबरोबर तिला काही वर्षांपूर्वी आलेल्या डिप्रेशनबद्दलही ती बोलली.
या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, “मी एके दिवशी मालिकेच्या सेटवर आले. तेव्हा कोणीही माझ्याकडे बघत नव्हतं. मेकअप आर्टिस्टही माझ्याकडे दुर्लक्ष करत होते. अशातच मला कळलं की मला मालिकेतून काढून टाकलं आहे. मला सेटवर जाता येत नव्हतं. कलाकार थांबले होते. तितक्यात एक प्रोडक्शनमध्ये काम करणारी मुलगी मला येऊन म्हणाली की चॅनलने मला मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.”
पुढे उर्मिला म्हणाली, “जेव्हा मला मालिकेतून काढण्यात आलं तेव्हा मला वाटलं की मी खूप फालतू आहे. अयशस्वी आहे. मूर्खासारखं सगळं सोडलं, सगळं दिलं. माझ्या आयुष्याची वाताहत झाली. पुढे प्रोडक्शन हाऊसने मला एके ठिकाणी नेलं आणि सांगितलं की तू सारखी आजारी असतेस आणि सही करून घेतली की तू स्वतःहुन ती मालिका सोडत आहेस. मी खूप दुःखात गेले. माझा आत्मविश्वास गेला. तू घाण दिसतेय, तुझी दाढी मिशी दिसते, तुझा तीळ काढला तर सुंदर दिसशील अशा कमेंट्स मला यायच्या. २०१६ मध्ये मी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मी सेटवर बेशुद्ध झाले होते. मी त्या कागदपत्रांवर सही केली म्हणून त्यांचं नाव घेऊ शकत नाही. खूप गोष्टी गमावल्या. पैसे गेले. खूप गोष्टी केल्या. दोष कोणाला दिला जातो! मी सोडली मालिका असं मी सगळ्यांना सांगितलं. पण कोणालाच माहीत नाही की मला काढलं गेलं. मी सेटवर माज करायचे म्हणून मला काढलं अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.”
हा संपूर्ण व्हिडिओ तिने तिच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करून ही सगळी गोष्ट चाहत्यांना सांगितली. तर आता त्यावर कमेंट करत तिचे चाहते उर्मिलाला सपोर्ट करताना दिसत आहेत.